गडचिरोली: एटापल्ली तालुक्यातील सूरजागड टेकडीवर वर्षभरापासून लोहखनिजाचे उत्खनन सुरू आहे. नुकतीच खाणीच्या विस्ताराबाबत जनसुनावणी घेण्यात आली. मात्र, स्थानिकांचा विरोध झुगारून सरकार बळजबरीने उत्खनन करीत आहे, असा आरोप करीत उत्खनन तत्काळ बंद करावे अन्यथा बघून घेऊ, अशी धमकी नक्षलवाद्यांनी स्थानिक आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह प्रशासनाला दिली आहे. नक्षल्यांचा प्रवक्ता श्रीनिवासने याबाबत एक पत्रक काढले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूरजागड परिसरात आदिवासींच्या पारंपरिक देवी देवतांचे अस्तित्व आहे. त्या भागात दरवर्षी मोठी यात्रा भरत असते. मात्र, लोहखाणीमुळे या भागाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. येथील नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट सुरू आहे. अवजड वाहतूकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले. टेकडीवरील गाळ शेतात आणि नदी नाल्यात साचत असल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. यामुळे अजय टोप्पो या आदिवासी शेतकऱ्याने आत्महत्या केली. परंतु सरकार आणि कंपनी पोलीस बळाचा वापर करून लोकांचा विरोध दडपण्याचा काम करीत आहे. विरोध करणाऱ्या स्थानिकांना तुरुंगात डांबण्यात आले. पांडू नरोटेला सुध्दा याच कारणांमुळे देशद्रोहाच्या कलमाखाली अटक करण्यात आली. तुरुंगात त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा >>> फडणवीस यांच्या टीकेला अजित पवार यांच खोचक उत्तर, म्हणाले…….

आम्ही सुरुवातीपासूनच याला विरोध करीत आहो. यासाठी कंपनीच्या एका अधिकाऱ्याची हत्या केली, वाहनांची जाळपोळ केली. पण शासनाने ठिकठिकाणी पोलीस केंद्र उभारून बळजबरीने खाणीचे काम सुरू केले. आता खाणीचा विस्तार करण्यात येणार आहे. हा सर्व प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. खाणीचे काम तत्काळ बंद न केल्यास परिणाम भोगण्यास तयार रहा, अशी धमकी नक्षल्यांनी पत्रकातून दिली आहे. यामुळे काही काळ शांत बंसलेले नक्षली पुन्हा एकदा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा >>> नागपूर: पत्नीचा मृत्यू, मुलगाही लांब, निराश पोलिसाने अखेर….

स्थानिक आमदारावर आगपाखड

सूरजागड लोहखाणीचे काम सुरू करण्यामागे स्थानिक आमदार धर्मरावबाबा आत्राम यांची मुख्य भूमिका असल्याचा आरोप करीत नक्षल्यांनी पत्रकात त्यांच्याविरोधातही आगपाखड केली आहे. स्थानिकांचा विरोध असतानाही आमदार आणि त्यांचे सहकारी खाणीच्या समर्थनात होते. त्यांनी हे सर्व कामे बंद न केल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी नक्षल्यांनी दिली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naxalites threaten mla and administration surjagad iron mine turn off nagpur news ssp 89 ysh