सूरजागड, लोह प्रकल्प
सूरजागड येथे सुरू असलेल्या लोह प्रकल्पावरून हिवाळी अधिवेशनात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली होती. पावसाळी अधिवेशनात पुन्हा एकदा नक्षल्यांनी पत्र काढून धर्मरावबाबांना धमकी दिली असून तुम्हाला आणि सहकाऱ्यांना किंमत चुकवावी लागेल असा उल्लेख केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा >>> नागपूर: आजारी पत्नी, विधवेशी दुसरे लग्न अन् पुन्हा तिसरीचा आयुष्यात प्रवेश! ‘भरोसा सेल’ने बजावली दीपस्तभांची भूमिका
अहेरी विधानसभेचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी अलीकडेच अजित पवार यांची साथ देत अन्न व औषध प्रशासन मंत्रीपद मिळवले. कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) पश्चिम सब झोनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने दोन पानी पत्रक काढून धर्मरावबाबांना धमकी दिली आहे. सूरजागड लोहखाणीला विरोध अधिक तीव्र करा, असे आवाहन करुन या प्रकल्पासह प्रस्तावित सहा लोह उत्खनन प्रकल्पांविरोधात भूमिका घेतली आहे. उत्खननाच्या सरकार असून या सरकारसोबत गेल्याने धर्मरावबाबा यांच्याविरोधात या पत्रकात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आत्राम आणि त्यांच्या सहकाऱ्याना आदिवासींचे जंगल , जमीन उध्वस्त केल्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही पत्राद्वारे दिला आहे. आत्राम यांनी घराण्यांची दलाली चालविली असल्याचा आरोप करत महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवर तोडगट्टा येथे सुरू असलेले खाणविरोधी आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहनही पत्रकातून केले आहे. दरम्यान, नक्षल्यांच्या या धमकीच्या पत्रकाची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. नक्षलसप्ताह सुरु असल्याने नक्षल्यांविरोधात मोहीम अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> अकोला: दोन गावांना पुराचा वेढा; शेतकरी अडकला पुरात, आपत्कालीन पथकाने वाचवला जीव
कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गडचिरोली जिल्ह्यात आता कुठे औद्योगिक विकासाला चालना मिळाली आहे. सूरजागड प्रकल्पामुळे हजारो हातांना रोजगार मिळाला आहे. जिल्ह्याचा विकास हेच माझे ध्येय आहे. त्यामुळे अशा धमक्यांकडे मी लक्ष देत नाही. -धर्मरावबाबा आत्राम, अन्न व औषध प्रशासन मंत्री