गडचिरोली : भामरागड तालुक्यातील केडमारा जंगल परिसरात ३० एप्रिल रोजी झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत कुख्यात नक्षलवादी बीटलू मडावीसह तिघांना ठार करण्यात पोलिसांना यश आले होते. याविरोधात नक्षल्यांनी बंदचे आवाहन केले असून भामरागड मार्गावर आज काही पत्रके आढळून आली.
३० एप्रिलरोजी गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी सी ६० जवानांनी विशेष अभियान राबवित केडमारा जंगल परिसरात तीन जहाल नक्षल्यांना कंठस्नान घातले. यात पेरमीली दलम कमांडर कुख्यात बीटलू मडावी याच्यासह डीव्हीसी वासू आणि अहेरी दलम सदस्य श्रीकांत ठार झाला. या तिन्ही नक्षल्यांवर अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. तसेच चळवळीतील महत्त्वाचे नेते म्हणूनदेखील त्यांच्याकडे बघितले जायचे. त्यामुळे ही चकमक नक्षल्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे.
यासाठी नक्षल्यांनी एक पत्रक काढून १५ मे रोजी बंदचे आवाहन केले होते. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी आलापल्ली – भामरागड मार्गावरील तलवाडा गावाजवळ बंद यशस्वी करण्याचे आवाहन करणारे पत्रक आढळून आले.
हेही वाचा – बुलढाणा: सहा वर्षीय बालिकेची निर्घृणपणे हत्या; चिखलीत कडकडीत बंद, जनमानस प्रक्षुब्ध
माडिया भाषेत असलेल्या या पत्रकात ठार झालेल्या तीन नक्षल्यांचा उल्लेख असून प्रशासनाच्या कारवाईचा निषेध नोंदविण्यात आला आहे. पोलीस विभागाने या घटनेला दुजोरा दिला आहे.