गडचिरोली : काही काळ शांत बसलेल्या नक्षल्यांनी पुन्हा डोके वर काढले असून बुधवारी रात्रीच्या सुमारास धानोरा तालुक्यातील छत्तीसगड सिमवेरील गावात नागरिकांनी गोळा केलेल्या तेंदूपानांची जाळपोळ केली. यावेळी आढळून आलेल्या पत्रकात तेंदूपानांचा भाव वाढवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सध्या तेंदू हंगाम सुरू आहे. यामाध्यमातून आदिवासींचे वर्षभराचे अर्थचक्र चालते. यातून नक्षल्यांनादेखील मोठ्या प्रमाणात खंडणी मिळत असते. मात्र, मागील वर्षी कमी भाव मिळाल्याने यंदा अनेक ठिकाणी तेंदू पानाची मजुरी घसरली आहे, तर काही ठिकाणी कंत्राटदारांनी ग्रामसभांनाच तेंदूपाने गोळा करण्यास सांगितले आहे. त्यामुळे नक्षल्यांना रसद मिळणे कठीण होऊन बसले आहे. परिणामी खवळलेल्या नक्षल्यांनी मागील दहा दिवसांपासून छत्तीसडमध्ये तेंदूफळींची जाळपोळ सुरू केली आहे.
बुधवारी रात्रीच्या सुमारास मुरूमगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील छत्तीसगड सीमेवरील रिधवाही गावात जवपास वीस फळींची जाळपोळ करण्यात आली. याठिकाणी एक पत्रकदेखील आढळून आले आहे. उत्तर गडचिरोली डिव्हीजन कमिटी भाकपा (माओवादी) नावाने असेलल्या या पत्रकात तेंदू पानांना अकराशे रुपये प्रती गोणी भाव द्या अशी धमकी देण्यात आली आली आहे. या संदर्भात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना विचारणा केली असता त्यांनी घटनेला दुजोरा दिला आहे. मात्र, हे कृत्य नक्षल्यांचे आहे की इतर कोणाचे याचा तपास सुरू असल्याचे सांगितले.