बुलढाणा: भाजपा नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुणे येथे शरद पवारांवर खालच्या पातळीवर केलेल्या टिकेने राजकीय वर्तुळात वादळ निर्माण झाले असून ‘त्या’ विधानावर विविध पक्षीय नेत्यांनी नापसंती व्यक्त केली आहे. केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी नुकतेच पुण्यात शरद पवारांवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा गट) नेते, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनीही या विधानाचा निषेध केला आहे. राजकीय परिस्थिती मुळे आपण अजितदादां सोबत गेलो असलो तरी, शरद पवार यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांवर अशी शेलक्या भाषेत टीका करणे योग्य नाही. वयाने आणि कर्तृत्वाने ज्येष्ठ असलेल्या शरद पवार यांना राज्यातील भ्रष्टाचाराचे सरदार वा भटकती आत्मा संबोधने, वैयक्तिक पातळीवर टीका करणे अयोग्य आणि निषेधार्हच असल्याचे मत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे. राजकारणात गट, तट मतभेद, रुसवे फुगवे असू शकतात. मात्र ते वैयक्तिक पातळीवर जाता कामा नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.शरद पवार हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदरणीय आहेत. राज्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातही त्यांनी आपली वेगळी छाप ठेवली आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन त्यांनी शेतकरी आणि लोकहित जपले आहे. अशा नेतृत्वाबद्दल अशा खालच्या पातळीवर केली जाणारी विधाने निश्चितच निंदनीय आहेत. मनाला वेदना देणारे आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा