अकोला : मंत्रालयात मोठ्या प्रमाणात दलाली चालते हे वास्तव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला. मविआ सरकारमध्ये रोहयो खात्याचे तत्कालीन मंत्री संदिपान भुमरे यांच्या ओएसडींनी दलालामार्फत शेत पाणंद रस्त्याच्या पाच कोटींच्या कामांसाठी पाच लाखाची मागणी केली होती. मंत्रालयातील आरोग्यासह विविध खात्यांमध्ये असे प्रकार चालत होते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज येथे केला आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्वीय सहायकांच्या नेमणुकीसंदर्भाने वक्तव्य करताना मुख्यमंत्र्यांनी त्याचे अधिकार स्वत:कडेच ठेवल्याचे म्हटले होते. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना कदाचित हे माहीत नाही की मंत्र्यांचे पीए, ओएसडी नेमण्याचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांचेच असतात. मंत्र्यांनी नावाचा प्रस्ताव पाठवायचा असतो. कुणाला राग आला तरी चालेल, पण ज्यांच्यावर आरोप आहेत, अशांची नियुक्ती होणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले. मंत्रालयातील स्वीय सहाय्यकांमार्फत होत असलेल्या दलालीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत होत आहे.
या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाष्य केले. मंत्रालयातील दलालीचा आपल्याला देखील वाईट अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले. ‘मविआ’ सरकारच्या काळात पाच कोटींच्या कामासाठी आपल्याकडे पाच लाखांची मागणी झाली होती, असे ते म्हणाले. तत्कालीन रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भूमरेंच्या ओएसडीसंदर्भात हा अनुभव आला. जिल्ह्यात शेत पाणंद रस्त्याच्या कामासाठी त्यांच्याकडे पाच कोटींचा प्रस्ताव दिला होता.
तो मंजूर करण्यासाठी मंत्र्यांच्या ओएसडीने दलालामार्फत पाच लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, या प्रकाराला नकार दिला. अनेक वेळा विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी, नगरसेवक या प्रकारे निधी आणत होते. आपल्याला हे कदापीही मान्य नव्हते. या प्रकरणी वरिष्ठ नेतृत्वाकडे तक्रार केली. संबंधितांवर कारवाई देखील झाली. मंत्रालयातील रोहयो, आरोग्यासह अनेक विभागात हा कारभार चालत होता, असा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. त्यामुळे आता स्वीय सहाय्यकांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या रोखठोक भूमिकेचे आपला पक्ष व आपण स्वागत करीत असल्याचे अमोल मिटकरी म्हणाले.