नागपूर : ज्या व्यक्तीचा नरडा दुसऱ्यावर तोंडसुख घेण्यासाठी वळवळत असेल त्या माणसाच्या नरड्यातून सरडा हा शब्द आला तर त्यात काही गैर वाटत नाही. संजय राऊत म्हणजे दुतोंडी साप आहेत. ज्यांनी ठाकरे आणि पवार कुटुंब वेगळे केले. त्यांनी सुप्रिया आणि अजित पवार या बहीण भावाबद्दल बोलू नये. संजय राऊत एक दिवस उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवल्याशिवाय राहणार नाहीत, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली.
आमदार अमोल मिटकरी नागपुरात आले असताते प्रसार माध्यमांशी बोलत होते. संजय राऊत हे अजित पवार यांच्याबद्दल बोलत असतील तर तोंडाचा पट्टा चालवणाऱ्यांचा बंदोबस्त राष्ट्रवादीला करता येतो. अजित पवार यांच्याऐवढी उंची त्यांनी राजकारणात गाठावी आणि त्यानंतर बोलावे, असेही मिटकरी म्हणाले. संजय राऊत निवडून आल्यावर त्यांनी गुलाल उधळला असेल. हिंदू धर्मात गुलाल हा पूजनीय रंग आहे. तिकडे हिंदुत्वाचा गजर करायचा आणि दुसरीकडे त्या रंगावर टीका करायची. महाविकास आघाडीचा पराभव होताना दिसून येत असल्यामुळे ते आपल्या तोंडाचा पट्टा चालवतात. महासन्मान यात्रेमध्ये गुलाबी रंग आणि लाल रंग कसा असतो हे संजय राऊत यांना दाखवून देऊ, असेही मिटकरी म्हणाले.
हेही वाचा : ‘पोकेमॉन गो’च्या स्पर्धेत नागपूरचा तरुण…तब्बल वीस लाख डॉलर….
लाडकी बहीण योजनेसाठी किती कोटी खर्च झाले, हे खर्च करणारे बघतील. मुस्लीम तरुण उच्चशिक्षित व्हावे त्यासाठी हजार कोटीचा निधी महायुतीने दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुस्लिमांची मते लोकसभेत मिळाली असली तरी आता विधानसभेत मिळणार नाहीत, हे शल्य उद्धव ठाकरे यांना असल्यामुळे ते टीका करत आहेत, असेही मिटकरी म्हणाले. विदर्भातील सर्वात जास्त जागा काँग्रेस लढणार, याचा अर्थ असा की, महाविकास आघाडीमध्ये आलबेल नाही. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाही. शरद पवार यांच्याकडून जयंत पाटील यांचा चेहरा समोर केला जातोय. तिकडे काँग्रेस नाना पटोले यांचा चेहरा समोर करत आहे. महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू असून ते एकत्र राहून लढू शकत नाही, असेही मिटकरी म्हणाले. महाविकास आघाडीचे आपसात पटत नाही. जागेचे वाटप कितपत होते आणि ते किती यशस्वी होते, हे पाहण्यासारखे असेल. आम्ही महायुतीत तीन पक्ष मिळून लढत आहोत. शरद पवार यांचा विदर्भ दौरा होणार आहे. ते आजही दौरे करत असल्यामुळे त्यांचे स्वागत, असेही मिटकरी म्हणाले.