अकोला : अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिरीष धोत्रे, तर उपसभापतीपदी ज्ञानेश्वर महल्ले यांची गुरुवारी अविरोध निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे शिरीष धोत्रे सलग चौथ्यांदा सभापतीपदी विराजमान झाले. या बाजार समितीवर धोत्रे गटाची तब्बल ४० वर्षांपासून सत्ता असून राष्ट्रवादीने वर्चस्व कायम राखले आहे.
अकोला बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि भाजपाने एकत्र येत सहकार पॅनल म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत वंचित आघाडी रिंगणात उतरली होती. शेतकरी शिव पॅनल सहकार पॅनलच्या विरोधात होते. मात्र, यात वंचितच्या पॅनलचा धुव्वा उडाला. काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि भाजपाच्या सहकार पॅनलने सर्वच्या सर्व १८ जागांवर विजय मिळवला आहे. यामध्ये राष्ट्रवादीने सर्वाधिक नऊ जागा जिंकल्या, तर भाजपा पाच, काँग्रेस व ठाकरे गटाला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या. शिरीष धोत्रे, विकास पागृत, दिनकर वाघ, वैभव माहोरे, संजय गावंडे, चंद्रशेखर खेडकर, राजीव शर्मा, दिनकर नागे, राजेश बेले, भरत काळमेघ, ज्ञानेश्वर महल्ले, अभिमन्यू वक्टे, सचिन वाकोडे, रामेश्वर वाघमारे, शालिनी चतरकर, माधुरी परनाटे, मुकेश मुरूमकार, हसन चौधरी हे विजयी झाले आहेत.
बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीपदाची निवड प्रक्रिया प्रशासनाच्यावतीने आज राबविण्यात आली. दोन्ही पदे राष्ट्रवादीकडे गेले आहेत. सभापतीपदी शिरीष धोत्रे, तर उपसभापतीपदी ज्ञानेश्वर महल्ले यांची अविरोध निवड झाली. दोन्ही पदाच्या अविरोध निवडीनंतर त्यांच्या समर्थकांकडून बाजार समितीमध्ये जल्लोष करण्यात आला. स्व. वसंतराव धोत्रे गटाने बाजार समितीतील दबदबा कायम राखला आहे.