नागपूर: सोयाबीन, कापसाला भाव, राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी, अजित पवार यांच्यावरील सिंचन घोटाळ्यावरील आरोपाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षात असताना घेतलेली भूमिका, याच्या जुन्या चित्रफिती दाखवत भाजप नेते खोटारडे असून येत्या निवडणुकीत त्यांना धडा शिकवा, असे आवाहन राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा समारोप मंगळवारी नागपुरात झाला. यावेळी गणेश टेकडी रोड परिसरात जाहीर सभा झाली. यावेळी माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी दहा वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी यात्रेत जे विधान केले होते त्याची चित्रफीत लावली आणि सोयाबीन, कापसाला भाव मागणाऱ्या फडणवीसांना सत्तेत आल्यावर त्याचा कसा विसर पडला, हे पुराव्यानिशी सांगितले. एका चित्रफितीत फडणवीस म्हणतात, एकदाचे अविवाहित राहीन पण राष्ट्रवादीसोबत जाणार नाही तर दुसऱ्या एका चित्रफितीत ते अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप करीत आहेत. सोबतच अजित पवार यांना तुरुगांत टाकण्याची भाषाही करताना दिसत आहेत. ही चित्रफीत दाखवून भाजप खोटे बोलते, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही देशमुख यांनी केले.
हेही वाचा… आधी पोलिसांकडून बळाचा वापर, नंतर मुख्यमंत्र्यांकडून बोलावणे
या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेनेचे (ठाकरे गट ) नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते व विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, आमदार सुनील केदार, जितेंद्र आव्हाड, सलील देशमुख, ॲड. अंजली साळवे, वर्षा श्यामकुळे, प्रकाश गजभिये यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी रोहित पवारांसह युवा संघर्ष यात्रेत सहभागी झालेल्या युवकांचे कौतुक केले. देशात दोन नेत्यांनी अशा यात्रा काढल्या होत्या. त्या दोन यात्रा राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या होत्या. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन ही यात्रा युवकांनी काढली. यातून त्यांना विविध प्रश्न समजले. पदभरती, कंत्राटी नोकर भरती, रिक्त जागा भरण्यासंदर्भातील अनेक प्रश्न त्यांच्यासमोर आले, असे शरद पवार म्हणाले.
८०० किलोमीटरचा प्रवास, ३२ दिवसांचा कालावधी, १० जिल्हे, २० तालुके, ४०० गावे, रोज tv कमीत कमी २५ किलोमीटरचा प्रवास आणि दोन लाखांहून अधिक सामान्य नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आल्याकडेही पवार यांनी लक्ष वेधले.