नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांची संघर्ष यात्रा १२ डिसेंबरला नागपूर विधानसभेवर धडकणार आहे. या यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांची २४ ऑक्टोंबर २०२३ पासून संघर्ष यात्रा सुरू आहे. जवळपास ८०० किलोमीटरची ही पदयात्रा आहे.
हेही वाचा : नागपूर ‘एम्स’मध्ये स्वतंत्र ‘ऑडिओलॉजी अँड स्पीच थेरपी’ कक्ष; कर्णदोषाच्या रुग्णांना होणार लाभ
राज्यातील कंत्राटी नोकरभरती रद्द करा , बेरोजगारी कमी करा, जातनिहाय जनगणना करा, शाळा दत्तक योजना रद्द करावी, महिला सुरक्षेसाठी शक्ती कायद लागू करावा, अंमलपदार्थाच्या विळख्यात सापडलेल्या युवकांना वाचवण्यासाठी ठोस उपाययोजना करा, यासह इतर मागण्यांसाठी ही पदयात्रा काढण्यात आली आहे. १२ डिसेंबरला ही यात्रा नागपूर येथे पोहोचणार असून याचे रुपांतर मोर्चात होवून हा मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे. मोर्चाचे झिरोमाईल येथे सभेत रुपांतर होणार आहे. या मोर्चाला संबोधित करण्यासाठी शरद पवार यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली आहे.