गोंदिया : राज्यात नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने शिंदे-फडणवीस सरकारला समर्थन जाहीर करत सत्तेत सहभाग घेतला. ९ मंत्र्यांनी शपथदेखील घेतली तसेच आता न्यायालयातून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्नदेखील सुटल्याने त्यात अजित पवार गटाचे प्रमुख नेते प्रफुल पटेल या राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यत्वकरिता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून आपल्या जिल्ह्यातील आपल्या समर्थकांची वर्णी लावणार या आशेने त्यांचे विश्वासू म्हणून गणले जाणारे भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या पाठोपाठ गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशूरामकर सक्रिय झाले आहेत.
यात एक पाऊल पुढे घेत जैन समर्थकांनी तर रविवारी तिरोड्यातील सभागृहात पत्रपरिषद घेऊन राजेंद्र जैन यांनाच परत राज्यपाल नियुक्त आमदार करावे अशी मागणी केली तर, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गंगाधर परशूरामकर यांच्या समर्थकांनीही त्यांच्याकरिता दबावतंत्र सुरू केले आहे. तर संपूर्ण भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समर्थकांनी सुनील फुंडेंकरिता समाजमाध्यमावर आपली मागणी असल्याचे जाहीर केले आहे.
हेही वाचा – वर्धा: मुलगी देण्यास नकार, भाच्याने केला मामावर वार!
यामुळे गोंदिया भंडारा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात या संदर्भात चर्चा सुरू आहे. पण सध्या पावसाळी अधिवेशन सुरू झालं असल्यामुळे हा राज्यपाल नियुक्त १२ विधान परिषद सदस्यांचा मुद्दा सध्या तरी थंडबस्त्यात असला तरी आता जिल्ह्यातील स्थानिक वर्तमान पत्राच्या माध्यमातून आपापली सक्रियता व प्रचार करण्याची या तीनही नेत्यात होड लागली असल्याचे चित्र गोंदिया भंडारा जिल्ह्यात आहे.