नागपूर: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समितीही गठीत करण्यात आली आहे.
दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणाच्या चौकशीची घोषणा गृहमत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आपल्यालाही बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. मात्र शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना बोलू देण्यास अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी परवानगी नाकारली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य अध्यक्षांच्या आसनासमोर धावले. त्यांनी आम्हालाही बोलू द्या, अशी मागणी केली. परंतु, अध्यक्षांनी कामकाज पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. त्यावर आक्षेप घेताना संतप्त झालेल्या जयंत पाटील यांनी विरोधकांना तुम्ही बोलू देत नाही, असे सांगत तुम्ही असला निर्लज्जपणा करू नकाह्ण, असे अध्यक्षांना सुनावले. त्यामुळे पाटील यांच्या निलंबनासाठी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी दीड तास कामकाज रोखून धरले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड संतापले. त्यांनी जयंत पाटील यांना आताच्या आता निलंबित करा, अशी मागणी केली. त्यावेळी उडालेल्या गदरोळात सभागृहाचे कामकाज पुन्हा तीनवेळा दीड तासांसाठी तहकूब करण्यात आले.
कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याचा तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी आचरण आणि नितीमुल्य समिती गठीत करण्याचा ठराव मांडला. तो बहुमताने मंजूर करण्यात आला.
सरकारची हुकूमशाही- जयंत पाटील
आपल्याला निलंबित केले तरी राज्यातील तरुणांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, महिलांच्या प्रश्नांसाठी लढतच राहणार असल्याचे सांगत जयंत पाटील यांनी सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत असल्याचा आरोप केला. दिशाभूल करणारे विषय सभागृहात उपस्थित करून सभागृहाचा मौल्यवान वेळ सत्ताधारी पक्षातील आमदार वाया घालवत होते. विरोधकांना बोलण्याची संधीच दिली जात नव्हती, तसेच मुख्यमंत्र्यांनी केलेले बेकायदेशीर भूखंड वाटप व गैरव्यवहाराबद्दल आम्ही उपस्थित करत असलेली चर्चा टाळण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न होत होता. म्हणूनच असा निर्लज्जपणा करू नकाह्ण असे शिंदे – फडणवीस सरकारला उद्देशून म्हणालो असे स्पष्ट करतानाच विरोधकांचा आवाज दाबण्याच्या आणि विरोधकांवर वचक बसवण्याच्या उद्देशाने सरकारने मी असे विधान अध्यक्षांना उद्देशून बोलल्याचा बनाव केल्याचा दावाही त्यांनी केला.
अजित पवार यांची दिलगिरी
जयंत पाटील यांच्याकडून अनावधानाने हा शब्द गेल्याचे सांगत झाल्या प्रकाराबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली. पाटील हे सभगृहातील ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांच्याकडून सहसा असा शब्दप्रयोग होत नाही. अध्यक्षांबद्दल आमच्या मनात आदरच आहे. त्यामुळे कोणताही गैरसमज होऊ नये. पण जेव्हा वारंवार विनंती करूनही आम्हाला बोलायची परवानगी दिली जात नाही. त्याचवेळी सत्ताधारी आमदारांना एकतर्फी संधी दिली जाते. आम्ही कामकाज करण्यासाठी सहकार्य करत आहोत. त्याचवेळी सत्ताधारी पक्षाचे आमदार गोंधळ घालून कामकाज बंद पाडत असतील तर तोल जाऊ शकतो. हा प्रकार अनावधानाने घडला आहे. तरी घडल्या प्रकाराबद्दल मी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करतो असे सांगत पवार यांनी हे निलंबन मागे घेण्याबाबत विचार व्हावा, अशी विनंतीही केली. त्यानंतर या निलंबनाच्या निषेधार्थ विरोधकांनी सभात्याग केला.