अकोला राष्ट्रवादीतील आ. अमोल मिटकरी व युवक जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्यातील वाद आता सायबर पोलिसांपर्यंत पोहोचला आहे. या वादाची आणखी एक चित्रफित प्रसारित होण्याची शक्यता लक्षात घेऊन आ. मिटकरींनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी शिवा मोहोड यांना हजर राहण्यास सायबर पोलिसांनी कळवले आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर आला. मोहोड यांनी आ. मिटकरींवर कमिशनखोरीचा आरोप केला. त्याला प्रत्युत्तर देताना आ. मिटकरींनी आरोप करणाऱ्यांचे चारित्र तपासावे, असे म्हटले होते. त्यामुळे संतापलेल्या मोहोड यांनी आ. मिटकरींवर आरोपांच्या फैरी झाडल्या. याप्रकरणी आ. मिटकरी यांनी पाच कोटी रुपयांची मानहानीची नोटीस वकिलामार्फत मोहोड यांना पाठवली, तर मोहोड यांनी देखील त्याला प्रत्युत्तर देताना चारित्र्यावर वक्तव्य केल्याप्रकरणी आ. मिटकरींना नोटीसद्वारे सात दिवसांत लेखी माफी व एक रुपयाची नुकसान भरपाई मागितली. आता हा वाद सायबर पोलिसांकडे गेला आहे.

हेही वाचा : बुलढाणा : अंगणवाडी सेविकेच्या मुलाचे सुयश ; प्रतिकूल परिस्थितीतही ‘नीट’मध्ये मिळवले यश

बैठकीतील चित्रफीत प्रसारित झाल्याप्रकरणी व आणखी काही चित्रफीत प्रसारित होण्याची शक्यता लक्षात घेऊन आ. मिटकरींनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली. या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी मोहोड यांना हजर होण्याच्या सूचना दिल्या आहेत. राष्ट्रवादीतील वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.