बुलढाणा : अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे ही केवळ भाजपचीच नव्हे तर अख्या महाराष्ट्राची मनस्वी इच्छा आहे, असे विधान अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले. पालकमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्यासमवेत संघटनात्मक दौऱ्यावर असलेले आमदार मिटकरी यांचे आज बुलढाण्यात आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी अनौपचारिक चर्चा करताना त्यांनी हा दावा बोलून दाखविला. भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांनी ही इच्छा वेळोवेळी बोलून दाखविली आहे. भाजपच नव्हे राज्यातील नागरिकांची ही सदिच्छा असल्याचा दावा त्यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : सकाळची रेल्वेगाडी धावते सायंकाळी! प्रवाशांचे बेहाल; समस्या सांगूनही लोकप्रतिनिधी घेईनात दखल

अजित पवारांनीच कार्तिकी एकादशीची महापूजा करावी

कार्तिकी एकादशीची पूजा कोणता उपमुख्यमंत्री करणार हा खमंग चर्चेचा विषय ठरला आहे. त्यावर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी ‘चिठ्ठ्या काढाव्या’, असा सल्ला दिला आहे. याबद्दल छेडले असता, मिटकरी म्हणाले की, कार्तिकी एकादशीची पूजा अजित पवारांनीच करावी, अशी माझी इच्छा आहे. आता राहिला प्रश्न जाधव यांच्या विधानाचा, तर त्यांनी वारकरी संप्रदायाला राजकारणात ओढू नये, असा त्यांना माझा सल्ला आहे. त्यांनी आधी वारकरी संप्रदायाचा अभ्यास करावा. पूजा कोणी करावी हा संस्थांनचा अधिकार आहे. भास्कर जाधव आणि पंढरपूर संस्थांनचा अजिबात संबंध नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : कार्तिकी एकादशीला पांडुरंगाची शासकीय महापूजा कोण करणार? सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले…

नाना पटोले यांच्या ‘हे सरकार मलाई खाण्यासाठी एकत्र’, या विधानावर त्यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. पटोले हे भाजपमध्ये असताना खूप मलई खात होते. त्यामुळे त्यांना तसे वाटते. त्यांची दिल्लीत काय किंमत आहे, हे त्यांनाही चांगले माहिती आहे. केवळ विरोधासाठी विरोध करावा म्हणून ते अशी वक्तव्य करतात, असे मिटकरी म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mla amol mitkari says not only bjp but entire maharashtra wish to see ajit pawar as chief minister scm 61 css