राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी आयोजित केलेल्या आमसभेला अधिकाऱ्यांनी दांडी मारल्यामुळे ते चांगलेच संतापले. कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
२१ फेब्रुवारीला सडक अर्जुनीत तालुकास्तरीय वार्षिक आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना १५ दिवसांपूर्वी सूचना देण्यात आली. मात्र, तरीही अधिकाऱ्यांनी या आढावा सभेकडे पाठ फिरवली. आढावा सभेच्या माध्यमातून जनतेचे ज्वलंत प्रश्न सुटावेत, असा हेतू असतानाही अधिकाऱ्यांनी या आढावा सभेला दांडी मारल्यामुळे अखेर त्या दिवशीही सभा रद्द करावी लागली. ही सभा आता ४ मार्चला होणार आहे. या संपूर्ण प्रकारामुळे आयोजक आ. चंद्रिकापुरे चांगलेच संतापले. सभेला दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांची राज्याचे ग्रामविकास सचिव राजेश कुमार यांना लेखी तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा- ‘४ जी’चा देशभर विस्तार, नवीन पदभरतीला मात्र ना…असे का?
तालुका, जिल्हा स्तरीय अधिकारी अशाप्रकारे कामचुकारपणा करत असतील तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी विनंती ग्राम विकास सचिव व राज्याचे ग्रामविकास मंत्री यांना लेखी तक्रारीद्वारे करणार असल्याचे आ. चंद्रिकापुरे म्हणाले. अधिकारी जिल्हा मुख्यालयी न राहता एचआर भत्ता मिळवतात आणि लोकप्रतिनिधीने बोलावलेल्या आमसभेला दांडी मारतात. हा प्रकार बंद व्हावा, यासाठी विशेष बाब म्हणून राज्य शासनाने जीआर काढावा, अशी सूचनाही मी राज्य शासनाला पुढील अधिवेशनात करणार असल्याचे आ. चंद्रिकापुरे यांनी सांगितले.