चंद्रपूर : भाजप, शिवसेना, काँग्रेस व अपक्ष असा राजकीय प्रवास असलेले अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष प्रवेश स्पष्टपणे नाकारल्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या व शेवटी आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार भाजपात स्थिरावले. जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाला कालपर्यंत तीव्र विरोध करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा मागासवगीर्य आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार जोरगेवार यांचा भाजप प्रवेश येथील हॉटेल ए. डी. मध्ये पार पडला. यावेळी आमदार जोरगेवार यांनी कार्यकर्त्यांची गर्दी गोळा करून जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

यावेळी महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्ष नम्रता आचार्य यांनी प्रवेश घेतला. या दोघांच्या भाजप प्रवेशाने भाजपची शक्ती या जिल्ह्यात वाढली आहे असे या प्रवेशाच्या वेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, या विधानसभा निवडणुकीत भाजपला व महायुतीला यश मिळेल असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील उमेदवार पक्षाने जाहीर केले आहे. आज दुपारपर्यंत चंद्रपूर मतदारसंघातील सहाव्या उमेदवाराचे नाव जाहीर होईल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

हेही वाचा – प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, डोसा आणि विक्रम, काय आहे वाचा

चंद्रपूर जिल्ह्यातील सहा व गडचिरोली जिल्ह्यातील तीन अशा एकूण नऊ जागा भाजप व महायुती जिंकणार आहे. जाहीरनामा व वाचानाम्यात चंद्रपूर जिल्ह्याला झुकते माप राहील असे मुनगंटीवार यांनी सांगितले. भाजप हा परिवार आहे, या परिवारात जोरगेवार व आचार्य यांचे स्वागत आहे असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीत पूर्णशक्तीने काम करतील असे मुनगंटीवार यांनी सांगितले. दिल्ली येथे पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते ब्रिजभुषण पाझारे यांना उमेदवारी मिळावी यासाठी गेलो होतो. जोरगेवार यांना उमेदवारी देऊ नका यासाठी गेलो नव्हतो असेही मुनगंटीवार म्हणाले. राजुरा येथे भाजपचे काही नाराज पदाधिकारी पत्र परिषद घेणार आहे अशी माहिती आहे. मात्र भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिथे लक्ष घातले असून ही पत्र परिषद होणार नाही असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

हेही वाचा – भाजपने तिकीट कापले अन् आमदार रडायला लागले; म्हणाले, “पक्षाने माझ्यावर…”

पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते नाराज झाले आहेत असे सांगण्यात येत असले तरी नाराज व अन्याय झालेल्या कार्यकर्त्यांचे योग्य पुनर्वसन केले जाईल. भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा व राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी तसे आश्वासन दिले आहे. भाजपचा आत्मा हा कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. प्रत्येकाला न्याय मिळेल, कुणावर अन्याय होणार नाही, अन्यथा कार्यकर्त्याची अवस्था बंद झालेल्या दोन हजारांच्या नोटसारखी होईल. कार्यकर्ते नाराज होईल मात्र भाजपमध्ये कार्यकर्ता नाराज होईल पक्षाचा विचार सोडणार नाही. त्यामुळे पाझारे बंडखोरी करून निवडणुकीत उभे राहणार नाही असेही मुनगंटीवार म्हणाले. कार्यकर्त्याला हवेवर सोडणार नाही असेही मुनगंटीवार म्हणाले. मला जिल्ह्यातील भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांची चिंता आहे. त्यांच्यावर अन्याय होणार नाही. २६ नोव्हेंबर रोजी राज्यात महायुतीचे सरकार येईल असाही विश्वास व्यक्त केला. यावेळी महानगर अध्यक्ष राहुल पावडे, ग्रामीण अध्यक्ष हरीश शर्मा, प्रमोद कडू, डॉ. मंगेश गुलवाडे उपस्थित होते.