राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने आश्चर्य

भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत भाजपला पराभूत करून राष्ट्रवादीला जागा परत मिळवून देणारे खासदार मधुकर कुकडे यांना राष्ट्रवादीचे वजनदार नेते आणि या मतदारसंघात प्रभावशाली असलेले प्रफुल्ल पटेल यांची खप्पामर्जी भोवली आहे. मधुकर कुकडे यांना उमेदवारी नाकारल्याने ते स्वत:ही आश्चर्य व्यक्त करीत आहेत. उमेदवारी नाकारली असली तरी आपण पक्षश्रेष्ठींवर नाराज नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभेची जागा आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. ही जागा २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीने गमावली होती. भाजपचे उमेदवार नाना पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांना हरवले होते. पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर पोटनिवडणुकीत मधुकर कुकडे यांनी राष्ट्रवादीला विजय मिळवून दिला. मात्र, आता कुकडे यांना उमेदवारी नाकारण्यात आली. कुकडे सतत लोकांच्या संपर्कात असतात. त्यांची लोकप्रियतादेखील उत्तम आहे. परंतु त्यांनी खासदार झाल्यापासून राष्ट्रवादीचे नेते पटेल यांची मर्जी राखली नाही. विकासकामे करताना त्यांनी पक्षभेद विसरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून काही कामे मंजूर करवून घेतली. पटेल यांच्याकडे कधी ऊठबस केली नाही. मतदारसंघात कामे करताना किंवा दिल्लीतही त्यांच्या जवळीक ठेवली नाही, त्याचा फटका त्यांना बसल्याची चर्चा आता सुरू आहे. कुकडे भाजपचे आमदार राहिले आहेत. चार वर्षांपूर्वी ते राष्ट्रवादीत आले. या चार वर्षांत राष्ट्रवादीला घराघरात पोहोचवल्याचा कुकडे यांचा दावा आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे हे पटेल यांचे निकटवर्तीय आहेत. ते पहिल्यांदाच आमदार झाले आणि त्यांना राज्यमंत्री पदही मिळाले होते.

पक्षाने आपल्याला उमेदवारी नाकारल्याचे आश्चर्य आहे. गेल्या नऊ महिन्यांत ६०० गावांचे दौरे केले. जनतादेखील आपल्या कामावर खूश आहे. राजकारण हा काही आपला व्यवसाय नाही. पक्षाने उमेदवारी दिली नाही, तरीदेखील आपण नाराज नाही. पक्षाचे काम करत राहू. – मधुकर कुकडे, खासदार