नागपूर : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमागे वाल्मिक कराड हा मुख्य सुत्रधार आहे. पोलिस या प्रकरणात दिशाभूल करत आहे. या अधिवेशनात वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर अधिवेशन संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे आमदार संदीप क्षीरसागर यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सोमवारी दिली.
हेही वाचा : “आता मंत्रीपद दिले तरी घेणार नाही,” विजय शिवतारेंची उद्विग्न प्रतिक्रिया
संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. सध्या या प्रकरणावरून पोलिसांच्या कार्यशैलीवर शंका व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संदीप क्षीरसागर म्हणाले,‘पोलिस या प्रकरणात दिशाभूल करत आहे. या हत्येमागे वाल्मिक कराड असल्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहे. या घटनेनंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात दहशतीचे वातावरण आहे. देशमुख कुटुंबीय भीतीच्या सावटखाली आहे. सरकारने या घटनेला कारणीभूत असलेल्या वाल्मिक कराडला अटक न केल्यास मोठे आंदोलन पुकारण्यात येणार आहे.’ आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले,‘बीड जिल्ह्यात दोन वर्षांत ३२ खून झाले आहेत. वाल्मिक कराड या सर्व प्रकरणांचा मास्टरमाइंड आहे. वाल्मिक कराडच्या मागे कोण, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे सरकारने जनतेच्या सुरक्षिततेचा परिचय देत त्याला अटक करावी. तसेच परभणी प्रकरणातील कारागृहात असलेल्या आंदोलकाच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार पोलिस कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे.’ या दोन्ही मुद्यांच्या अनुषंगाने मविआतील आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी आमदार अभिजित वंजारी, आमदार रोहित पाटील, आमदार भाई जगताप उपस्थित होते.