सर्वत्र वटपौर्णिमेचा सण साजरा होत असताना राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पतीच्या निधनानंतर वैधव्य आलेल्या महिलांसोबत वटपौर्णिमेची पूजा केली. यावेळी त्यांनी उखाणाही घेतला. सुप्रिया सुळेंच्या या अनोख्या वटपौर्णिमेची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. यानिमित्ताने त्यांनी समाजासमोर एक नवा आदर्श ठेवल्याचंही बोललं जात आहे.
विधवांना कुठल्याही सण-समारंभात स्थान दिले जात नाही. याच परंपरेला फाटा देत सुप्रिया सुळे यांनी आज अमरावतीत विधवा महिलांसोबत वटपौर्णिमेचे पूजन करून एक नवा पायंडा पाडला. सुप्रिया सुळे यांनी वडाची पूजा करून वटपौर्णिमा साजरी केली. यावेळी ‘ग्लासात ग्लास छत्तीस ग्लास सदानंदराव फस्ट क्लास,’ असा उखाणा सुप्रिया सुळे यांनी घेतला. यावेळी उपस्थित महिलांनी टाळ्यांचा गजर केला. ज्येष्ठ महिलांनी सुप्रिया सुळे आणि सदानंद यांना दिर्घायुष्य लाभो असे आशीर्वाद दिले.