नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाचे तीव्र पडसाद नागपूर शहरातील कार्यकर्त्यांमध्ये दिसून आले. खासदार प्रफुल्ल पटेल आणि बाबा गुजर यांच्या विरोधात “गद्दार, गद्दार” अशा घोषणा देत त्यांचे पोस्टर आज नागपुरात फाडण्यात आले. दरम्यान, शहर कार्यकारिणीच्या बैठकीत संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. पण आजच्या बैठकीनंतर चित्र स्पष्ट झाले आहे. अजित पवार यांच्यासोबत गेल्यामुळे नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांची यापूर्वीच हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे शहर राष्ट्रवादी काँँग्रेसचे अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते.
शहर कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला दुनेश्वर पेठे, प्रवीण कुंटे तसेच सर्व आघाडी आणि सेलचे पदाधिकारी अध्यक्ष उपस्थित होते. एकमताने ठराव घेऊन शरद पवार यांच्यावर विश्वास दर्शवण्यात आला. ठरावाचे शेखर सावरबांधे, रमन ठवकर अनुमोदक तर सभेचे अध्यक्ष दुनेश्वर पेठे होते. या बैठकीनंतर काही कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी शरद पवार यांच्याशी गद्दीर करणारे प्रफुल्ल पटेल आणि बाबा गुजर यांचे पोस्टर, बॅनर्स फाडले. या दोन्ही नेत्यांविरोधात घोषणा देण्यात आल्या.