लोकसत्ता टीम
नागपूर : येत्या ७ ते २० डिसेंबरला शहरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होत असून यावर्षी अधिवेशनादरम्यान विविध संघटना, राजकीय पक्ष, सामाजिक गट आणि कर्मचाऱ्यांचे जवळपास १३० मोर्चे धडकण्याची शक्यता आहे. त्यातही १२ डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसची संघर्ष यात्रा आणि जुनी पेंशनसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचा मोठा मोर्चा आहे. या मोर्चा आणि संघर्ष यात्रेसाठी पोलिसांच्या बंदोबस्ताची परीक्षा राहणार आहे.
हिवाळी अधिवेशनात संपूर्ण राज्यातून पोलीस कर्मचाऱ्यांना बंदोबस्तासाठी बोलावण्यात येते. ७ ते २० डिसेंबरदरम्यान होणाऱ्या अधिवेशनासाठी बाहेर जिल्ह्यातून ३ हजार पोलीस कर्मचारी येण्याची शक्यता आहे. १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांची संघर्ष यात्रा नागपुरात पोहचणार आहे. ही यात्रा विधानभवनाजवळ थांबवण्यात येणार आहे. त्यांची सभा मॉरेस कॉलेज चौकात होणार आहे.
आणखी वाचा-“हातात दगड घेऊ, कायदा पाहणार नाही,” विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा सरकारला इशारा
तसेच जुनी पेंशनसाठी राज्यातील जवळपास २५ हजार शासकीय कर्मचारी विधानभवनावर धडकणार आहेत. त्यांनी सीताबर्डी परिमंडळ दोनजवळ थांबवण्यात येणार आहे. संघर्ष यात्रा आणि जुनी पेंशन संघटनेचे कर्मचारी एकत्र येऊन विशाल सभेत रूपांतर होण्याची शक्यता होती. मात्र, पोलिसांनी कर्मचारी संघटनेला वेगळा मार्ग ठरवून दिला. हिवाळी अधिवेशनदरम्यान वाहतुकीची कोंडी होणार आहे. सध्या बंद असलेला टेकडी मार्ग तेथील मलबा हटवून पुन्हा करण्यात येणार आहे. त्या रस्त्यावरून मोर्चेकऱ्यांना परवानगी देण्यात येणार आहे.