अनिल कांबळे, लोकसत्ता
नागपूर : अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी) देशात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अॅट्रोसिटीचे सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशात दाखल झाले असून दुसऱ्या स्थानावर राजस्थान आहे. यामध्ये महाराष्ट्राचा सहावा क्रमांक लागतो. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनआरसीबी) जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.
गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारीचा विचार केल्यास अनुसूचित जातीच्या नागरिकांवर अन्याय-अत्याचारांच्या घटनांमध्ये जवळपास सात हजार गुन्ह्यांनी वाढ झाली आहे. देशात २०२०मध्ये ५० हजार २९१ गुन्हे तर २०२१मध्ये ५० हजार ९०० गुन्हे दाखल होते. २०२२मध्ये तब्बल ५७ हजार ५८२ गुन्हे दाखल झाले. सर्वाधिक गुन्हे मध्य प्रदेशात झाले आहेत. तिथे २,९७९ गुन्हे दाखल आहेत. दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान (२,५२१), तिसऱ्या स्थानावर ओडिशा (७७३) तसेच महाराष्ट्रात ७४२ गुन्ह्यांची नोंद आहे.
हेही वाचा >>> मणिपूरमध्ये गोळीबाराची घटना, १३ अज्ञात व्यक्तींचे मृतदेह आढळले
तब्बल ९५४ जणांची हत्या
देशात २०२२मध्ये अनुसूचित जाती जमातीच्या तब्बल ९५४ जणांची हत्या झाली तसेच १,१२६ जणांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले. १८ हजार ४२८ गुन्ह्यांमध्ये अनुसूचित जातीच्या नागरिकांना मारहाण करण्यात आली. यासोबतच जातीवाचक शिवीगाळ किंवा मारण्याच्या धमक्या देण्याच्या गुन्ह्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. १,०८७ जणांचे अपहरण झाल्याची नोंद पोलिसांच्या दप्तरी करण्यात आली आहे.
महिलांवर सर्वाधिक अत्याचार
‘अॅट्रॉसिटी’च्या गुन्ह्याअंतर्गत देशात महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या ७६० घटना घडल्या. ४,१६० महिलांवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, विनयभंगाच्या घटनांची नोंद आहे. ३,४३९ महिलांना मारहाण करून त्यांच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिलांचा अपमान करून शिवीगाळ करण्याच्या २,१२३ घटना घडल्या.
अॅट्रॉसिटी गुन्हे
उत्तर प्रदेश १५३६८
राजस्थान ८७५२
मध्य प्रदेश ७७३३
बिहार ६५०९
ओदिशा २९०९
महाराष्ट्र २७४३
महिलांवरील अत्याचारांतही उत्तर प्रदेश पुढे
पुणे : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार वाढीस लागल्याची धक्कादायक माहिती एनसीआरबीच्या अहवालात देण्यात आली आहे. अपहरण, महिलांचा छळ, आत्महत्येस प्रवृत्त करणे, महिलांवरील हल्ले, विनयभंग, बलात्कार अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. महिलांवरील अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशात दाखल झाले आहेत. त्याखालोखाल राजस्थान आणि महाराष्ट्राचा क्रमांक आहे.
देशभरात २०२२मध्ये महिलांवरील अत्याचाराचे चार लाख २८ हजार २७८ गुन्हे दाखल झाले होते. यात उत्तर प्रदेश आणि राजस्थान ही राज्ये अधिक बदनाम असली तरी, महाराष्ट्रात २०२२ मध्ये महिलांवरील अत्याचाराचे ३९ हजार ५२६ गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबई, पुणे, नागपूर शहरात अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळय़ात ओढून त्यांना पळवून नेण्याचे गुन्हे वाढत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
अपहरणाच्या घटनांना जोर
महिला, मुलींना जाळय़ात ओढून त्यांचे अपहरण करण्याचे सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशात दाखल झाले आहेत. उत्तर प्रदेशात दहा हजार ५७४ अपहरणाचे गुन्हे दाखल झाले आहे. उत्तर प्रदेशानंतर बिहारमध्ये महिला, मुलींना पळवून नेण्याचे गुन्हे वाढत आहेत. बिहारमध्ये २०२२ मध्ये अशा प्रकारचे आठ हजार ६६१ गुन्हे दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात महिलांचे अपहरण केल्याप्रकरणी सात हजार ५५९ गुन्हे दाखल झाले आहेत. देशातील प्रमुख महानगरांत अपहरणाचे गुन्हे दाखल होत आहेत. २०२२ मध्ये महिला, अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याप्रकरणी दिल्लीत तीन हजार ९४८ गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबई (११०३) आणि बंगळुरूत (५७८) गुन्हे दाखल झाले आहेत.
मुंबईत विनयभंगाच्या सर्वाधिक घटना
विनयभंग, अश्लील वर्तन केल्याप्रकरणी महाराष्ट्रात गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढते आहे. आंध्र प्रदेशनंतर महाराष्ट्रात विनयभंग प्रकरणात सर्वाधिक गुन्हे दाखल होतात. देशातील प्रमुख महानगरांत विनयभंग केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यांचा विचार केल्यास २०२२ मध्ये मुंबईत सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबईत ४८१ गुन्हे दाखल झाले होते.
बलात्काराचे सर्वाधिक गुन्हे राजस्थानात
२०२२ मध्ये राजस्थानात सहा हजार ३३७ गुन्हे दाखल झाले. मध्य प्रदेश अणि उत्तर प्रदेशात अनुक्रमे दोन हजार ९४७ आणि दोन हजार गुन्हे दाखल झाले होते. महाराष्ट्रात दोन हजार ४९६ गुन्हे दाखल झाले होते.
महिला आत्महत्या चिंताजनक
’छळामुळे महिला आत्महत्या करतात. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नातेवाइकांसह परिचितांविरुद्ध गु्न्हा दाखल केला जातो.
’महिलांचा छळ करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी देशात सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात दाखल होतात. २०२२ मध्ये महाराष्ट्रात ९२७ गुन्हे दाखल झाले होते. ’मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये अनुक्रमे ७५८ आणि ४५६ गुन्हे दाखल झाले होते.