यवतमाळ : येथील शेतकऱ्यांची बँक म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मर्जीतील काही अधिकारी नेहमीच्या पार्टीत दंग असताना बँकेच्या अध्यक्षांच्या वाहनातून चक्क साडेतीन लाख रूपयांची रोकड उडविण्यात आली. या घटनेने बँकेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली. प्रतिष्ठा जपण्यासाठी पोलिसांत लेखी तक्रार देण्यात आली नाही. मात्र पोलिसांची मदत घेवून चोराला शोधण्यात यश आले. बँकेच्या उपाध्याक्षांच्या वाहनावरील माजी चालकाने ही रक्कम लंपास केल्याचे उघड झाले.
शेतकऱ्यांची ही बँक गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. कधी नोकर भरती तर कधी शाखांमधील अफरातफर यामुळे बँक कायम चर्चेत असते. आता पार्टीतून अध्यक्षांच्याच वाहनातील रोकड लंपास झाल्याने बँक चर्चेत आली. यवतमाळ शहरानजीक लोहारा परिसरात बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व काही अधिकारी नेहमीप्रमाणे पार्टीसाठी गेले. बँकेचे संचालक, अधिकाऱ्यांच्या पार्ट्या नित्यानोच्या झाल्या आहेत. लोहारा परिसरात रंगलेल्या या पार्टीत ‘खेळ’ रंगला. या खेळात होणारी उलाढाल चर्चेचा विषय असते. पार्टीत खेळ चालत असल्याने येथे येणाऱ्या संचालकांच्या वाहनात नेहमीच रोकड असते. याची माहिती वाहन चालकांनाही असते. हीच बाब हेरून त्या दिवशी अध्यक्ष, उपाध्यक्ष व अधिकारी पार्टीत रमल्याचे बघून एका चालकाने अध्यक्षांच्या वाहनातील रक्कम लंपास केली. उपाध्यक्षांच्या वाहनावरील माजी चालकाने अध्यक्षांच्या वाहनाचे काच फोडून रक्कम लंपास केली. अध्यक्ष पार्टीहून परत आल्यानंतर त्यांना वाहनाची काच फुटलेली दिसली. वाहनात ठेवलेली रोकडही लंपास झाल्याचे आढळले. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
हेही वाचा…New Year : नववर्षात आप्तजनांना अनोख्या वस्तूंची भेट देण्याकडे नागपूरकरांचा कल…
पार्टीत उपस्थित असलेल्या सर्वांना विचारपूस करूनही काहीच सुगावा लागला नाही. त्यामुळे प्रकरण पोलिसांकडे पोहचले. पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. तसेच तेथील सीसीटिव्हीची तपासणी केली. तेव्हा उपाध्यक्षाच्या माजी चालकाने रोकड उडविल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्या चालकाला ताब्यात घेवून पोलिसी हिसका दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली व रोकड परत आणून दिली. चोरी गेलेली रक्कम परत मिळाल्याने अध्यक्षांसह उपाध्यक्ष व पार्टीत उपस्थित अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. बँकेची प्रतिष्ठा धुळीस मिळू नये, हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली नाही. पोलिसांनीही सर्व प्रकार ‘ऑफ दि रेकॉर्ड’ ठेवण्याचे अभिवचन दिले. मात्र आता बँकेसह पोलीस वर्तुळात या पार्टीतील चोरीची खमंग चर्चा सुरू आहे. सोबतच अध्यक्षांच्या ज्या वाहनाची काच फोडून ही चोरी करण्यात आली होती, ती काचही तातडीने बसवून घेण्यात आली. त्यासाठी १५ हजार रूपयांपेक्षा अधिक खर्च करण्यात आल्याची चर्चा आता बँकेत सुरू आहे.