गेल्या ६५ वर्षांत शासनाकडून आणि सहित्य क्षेत्रातही शेतकऱ्यांच्या वाटय़ाला उपेक्षाच आली.  शेती हा अर्थव्यवस्थेच्या पाठीचा कणा असून, साहित्यिकांनी त्याचा अभ्यास करून त्याला साहित्यात योग्य स्थान देण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी विठ्ठल वाघ यांनी व्यक्त केले.
पिंपरी- चिंचवडमध्ये होऊ घातलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ निवडणूक रिंगणात उभे आहे. ‘लोकसत्ता’ कार्यालयाला त्यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.
आतापर्यंत ८८ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाली आहेत मात्र त्यात शेती आणि शेतकरी याबाबत कधीच विचार करण्यात आला नाही. गेल्या ६५ वर्षांत शासनाकडून आणि साहित्य क्षेत्रात शेतकऱ्यांची उपेक्षाच झाली. आपला देश कृषी प्रधान असला तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे फारसे गंभीरपणे बघितले जात नाही. आतापर्यंत शेतकऱ्यांचे बाह्य़ चित्रण समोर आले आहे. शेती आणि शेतकरी हा विषय खरंतर अर्थशास्त्राशी निगडीत आहे मात्र त्यादृष्टीने आजपर्यंत विचार करण्यात आला नाही. नव्या पिढीतील साहित्यिकांनी सध्याचे वास्तव मांडत त्या दृष्टीने अभ्यास करुन त्याला साहित्यात स्थान दिले तर खरी माहिती समोर येईल. भूमी अधिग्रहण, सेझ, बाजारभाव हे सर्व विषय शेतीशी संबंधीत आहे मात्र त्याचा अभ्यास केला जात नाही. शेतकरी हा अर्थव्यवस्थेच्या पाठीचा कणा असून सध्या तो मोडून पडला आहे. भांडवलदाराचे धोरण राबविले जात आहे. साहित्यिकांनी या सर्व प्रश्नांवर दबाव निर्माण करण्याची गरज आहे. आज जे काही साहित्य लिहिले जात आहे किंवा लिहिले गेले तर ५ टक्के ग्रामीण जीवनावर आणि ९५ टक्के शहरीकरणावर आहे. पाना- फुलाच्या पलिकडे ग्रामीण भागातील साहित्य लिहिले गेले नाही. शेतकऱ्याच्या प्रश्नांवर किती साहित्यिकांनी लेखन केले आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असून त्यांना न्याय देण्यासाठी किंवा साहित्य क्षेत्राचे लक्ष वेधण्यासाठी सुवर्ण संधी आली आहे. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून निवडून आलो तर मिळालेल्या संधीचे सोने करणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात मराठवाडा, विदर्भात दुष्काळ असल्यामुळे आगामी संमेलन हे साध्या पद्धतीने व्हावे अशा आग्रह धरणार आहे आणि त्याप्रमाणे मी आयोजक संस्थांच्या लोकांशी संवाद साधला आहे.
साहित्य संमेलनावर लाखो रुपये खर्च केले जातात. शासन त्यांना अर्थसहाय्य करीत असताना यावेळी मात्र शासनाची मदत घेतली जाणार नाही अशी माहिती आहे. प्रकाशक अरुण जाखडे यांनी प्रकाशक म्हणून नाही तर साहित्यिक म्हणून निवडणुकीत उतरले पाहिजे. या निवडणुकीच्या निमित्ताने प्रकाशकांची आणखी एक भिंत निर्माण झाली आहे. माझी स्पर्धा चारही उमेदवारांशी आहे. कुणाला कमी लेखू नये अशी माझी भूमिका असली सर्व घटक संस्थांसह अनेकांचा मला पाठिंबा मिळत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांकडून मतपत्रिका जमा करणे मला पटत नाही मात्र तशी पद्धत अवलंबिली जात आहे यावर त्यांनी खंत व्यक्त केली. साहित्य संमेलनाची निवडणूक होऊ नये अशी माझी भावना आहे. ज्येष्ठ प्रतिभावंताना हा सन्मान मिळाला पाहिजे आणि तो त्यांचा अधिकार असतो. मात्र त्या पद्धतीने निवड केली तरी वाद होतात. त्यामुळे लोकशाही असल्यामुळे आता निवडणुकीशिवाय पर्याय नसल्याचे वाघ म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा