लोकसत्ता टीम
नागपूर : नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून आज नागपूर येथे सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात परिषदेच्या सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी उडाली.
प्रकरण काय ?
काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी अमित शाह यांच्या विधानाचा एक व्हिडीओ समोर आणला होता. या व्हिडीओत अमित शाह हे विरोधकांवर टीका करताना म्हणतात, “आंबेडकर… आंबेडकर म्हणायची आता एक फॅशन झाली आहे. एवढं जर देवाचं नाव घेतलं असतं तर सात जन्मापर्यंत स्वर्ग मिळाला असता.” शाह यांच्या याच विधानावर संसदेत विरोधकांनी आक्षेप घेत हा आंबेडकरांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.
आणखी वाचा-सत्तेचा माज डोक्यात गेल्यानेच बाबासाहेबांचा अवमान… विरोधकांनी थेट अमित शहांना…
संसदेत काय झाले ?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. आधी संसदेच्या बाहेर काँग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार निदर्शने केली. “अमित शाह माफी मांगो..” च्या घोषणा दिल्या. त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी “अमित शाह माफी मांगो” आणि “जयभीम”च्या घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. यावेळी विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल टिप्पणी केली होती. त्यामुळे काँग्रेससह विरोधक चांगलेच आक्रमक झाले. विरोधकांनी या विधानावरून अमित शाह यांना माफी मागण्याची मागणी केली.
आणखी वाचा-नागपूर सुधार प्रन्यास पुन्हा बरखास्त होणार! आता तर भाजपच्या आमदारानेच…
विधानपरिषदेत काय झाले ?
परिषदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी “पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन” अंतर्गत संसदेत झालेल्या या प्रकरणावर बोलण्यास सुरुवात केली. त्यावेळी सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. “हा संसदेचा विषय आहे, परिषदेच्या सभागृहात कशाला..?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तर त्याचवेळी सभापती नीलम गोऱ्हे यांनीदेखील दानवे यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा गैरवापर करू नका, असे सांगितले. सत्ताधारी गोंधळ घालत असतानाच दानवे यांच्यासह विरोधकांनी सभापती यांच्या आसनासमोर येत घोषणा देण्यास सुरुवात केली. गोऱ्हे यांनी दानवे यांना बोलण्याची संधी नाकारताच विरोधकांनी सभात्याग केला.