लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आणलेले चित्ते आता भारतातील हवामानाला सरावले आहेत. ‘नीरवा’ या मादी चित्त्यांने बछड्यांना जन्म दिला आहे, पण तीने किती बछड्यांना जन्म दिला हे अजूनही समोर आलेले नाही. मात्र, मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात पुन्हा एकदा पाळणा हलल्याने आनंदाचे वातावरण आहे.

मध्यप्रदेशातील शोपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सप्टेंबर २०२२ मध्ये नामिबियातून आठ (पाच मादी, तीन नर) तर फेब्रुवारी २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून बारा चित्ते (सात नर, पाच मादी) आणले. या दोन वर्षाच्या कालावधीत त्यातील आठ चित्त्यांचा (तीन मादी आणि पाच नर) मृत्यू झाला. यातील काहीचा संसर्गामुळे, काहींचा आपसातील लढाईमुळे, तर अलीकडेच झालेला मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे कारण समोर आले. मात्र, या सर्व कारणांवर संशोधक आणि तज्ज्ञांनी प्रश्न उभे केले आहेत. याच कालावधीत भारतात १७ बछड्यांनी जन्म घेतला. त्यापैकी पाच बछड्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता भारतातील चित्त्यांची संख्या २४ इतकी आहे. अलीकडेच ‘पवन’ या चित्त्याचा कुनोत मृत्यू झाला.

आणखी वाचा-अलीम पटेल यांना चक्क ५४ हजार मते; कशी साधली किमया…

दरम्यान आता कुनो राष्ट्रीय उद्यानातून एक चांगली बातमी समोर आली आहे. मादी चित्ता ‘नीरवा’ हीने श्योपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानात बछड्यांना जन्म दिला आहे. ‘नीरवा’ ही दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांपैकी एक आहे. मे २०२३ मध्ये पहिल्यांदा तिला खुल्या जंगलात सोडण्यात आले होते. त्यापूर्वी तिला खुल्या आणि मोठ्या पिंजऱ्यात इतर चित्त्यांसाेबत ठेवण्यात आले होते. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मादी चित्ता गर्भवती असल्याची माहिती शेअर केली होती आणि ती लवकरच बछड्यांना जन्म देईल, असे सांगण्यात आले. याआधी कुनोमध्ये चित्त्यांच्या १७ बछड्यांचा जन्म झाला होता.

आणखी वाचा- रेल्वेमंत्री अचानक पोहोचले दीक्षाभूमीवर… निवडणुकीआधी त्यांचा…

दरम्यान आता ‘नीरवा’ या मादी चित्त्याने बछड्यांना जन्म दिल्यामुळे ‘चित्ता प्रकल्पा’साठी हे एक मोठे यश मानले जात आहे. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यान हे भारतात स्थलांतरित करण्यात आलेल्या चित्त्यांसाठी पहिले घर ठरले. चित्ता प्रकल्पाअंतर्गत भारतात आणलेल्या चित्त्यांवर आता ‘वेबसिरीज’ तयार करण्यात येत आहे. केंद्राकडून या ‘वेबसिरीज’ला मान्यता देण्यात आली असल्याचीदेखील चर्चा आहे. त्यासाठी ‘शेन फिल्म्स अँड प्लॅटिंग प्रोडक्शन’ या निर्मिती संस्थेला कुनो राष्ट्रीय उद्यान आणि गांधी सागर वन्यजीव अभयारण्यात चित्रीकरणाची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. चित्ता प्रकल्प यशस्वी करण्यासाठी भारताने केलेले प्रयत्न या ‘वेबसिरीज’च्या माध्यमातून जगाला कळावे, या उद्देशाने ती तयार करण्यात येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neerva female cheetah gives birth to cubs in kuno national park in madhya pradesh rgc 76 mrj