नागपूर : देशातील वैद्याकीय पदवी अभ्यासक्रमाच्या शासकीय आणि खासगी अशा एकूण ५४९ महाविद्यालयांच्या ७८ हजार ३३ जागांसाठी प्रवेश दिला जातो. ‘नीट’ उत्तीर्ण होणाऱ्या संख्येत तब्बल दोन लाखांनी वाढ झाली असून ६०० च्यावर गुण घेणाऱ्यांची संख्याच एक लाखांहून अधिक आहे. त्यामुळे ६०० पेक्षा कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा समुपदेश फेरीचीही संधी मिळण्याची शक्यता धुसर आहे.
वैद्याकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता घेण्यात आलेल्या ‘नीट-यूजी’ २०२४ सामाईक प्रवेश परीक्षेच्या निकालावरून देशभर वादाचे लोण पसरले आहे. काही पालकांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिकाही दाखल केली आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), केंद्रीय विद्यापीठांसह शासकीय वैद्याकीय महाविद्यालय तसेच अभिमत विद्यापीठांमध्ये एमबीबीएस, बीडीएस आणि बीएस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी ‘नीट’ची परीक्षा घेण्यात येते. यात देशभरातून सुमारे २४ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ५ लाख ४७ हजार ३६ विद्यार्थी आणि ७ लाख ६९ हजार २२२ विद्यार्थिनी वैद्याकीय प्रवेशासाठी पात्र ठरल्या आहेत.
यंदा पात्र ठरणाऱ्यांच्या संख्येत तब्बल दोन लाखांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ‘पात्रता गुणां’मध्ये (कट ऑफ) प्रचंड वाढ झाली. उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न भंगले आहे. देशात वैद्याकीय अभ्यासक्रमाच्या उपलब्ध जागांच्या तुलनेत ६०० गुणांच्या वर उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्याच एक लाखाच्या घरात असल्याने अनेक विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.
‘नीट’मध्ये सहाशेच्यावर गुण घेणाऱ्यांची संख्या एक लाखांवर!
वैद्याकीय पदवी प्रवेशांसाठी समुपदेशन समितीकडून अखिल भारतीय १५ टक्के कोट्याअंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबवली जाते तर उर्वरित ८५ टक्के जागांवर प्रवेशासाठी संबंधित राज्यांतील यंत्रणेकडून प्रवेश दिले जातात. यंदा ८५ टक्के राज्यातील जागांवर प्रवेशासाठी प्रचंड चढाओढ राहणार आहे. २०२३ मध्ये ६३० गुण घेणाऱ्यांची संख्या ही १२ हजार ५००च्या घरात होती. ती यंदा ५० हजारांवर गेली.
‘नीट’ घोटाळ्याची चौकशी करा
‘ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन’च्या वतीने बुधवारी व्हेरायटी चौक येथे ‘नीट’ परीक्षा घोटाळ्याची न्याय्य चौकशी करावी व विद्यार्थ्यांना तात्काळ न्याय मिळावा या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने देशभरात ‘नीट’ घोटाळ्यावर आंदोलन केले जात आहे. नागपुरात राज्यसचिव वैभव चोपकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत या संपूर्ण घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी रीदम काळे, संघर्षशील गजभिये, अनुराग पवार, तन्नू बोरकर, मयूरी चव्हाण, सुजिता चौधरी आदींची उपस्थिती होती.