नागपूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पाची कामे महाराष्ट्रात सुरू आहेत, परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर अशा प्रकल्पांसाठी राज्याचा वाटा देणे बंद करण्यात आले. परिणामी, पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्पाची गती मंदावली. आता मात्र त्या प्रकल्पांना पुन्हा राज्याचा वाटा देणे सुरू झाले असून कामांना वेग आला आहे, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरात केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजनी येथे ९०४ कोटी ४० लाख रुपयांच्या १२  आरओबी प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन शनिवारी पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, मोदी सरकार आल्यानंतर पायाभूत सुविधांच्या कामांना चालना मिळाली. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रकल्पाआड अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. या कामाला अधिक गती प्राप्त व्हावी म्हणून मुख्यमंत्री असताना महारेल स्थापन करण्यात आली, परंतु राज्यातील सरकार बदलले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनी निधी देण्याचे बंद केले. त्यामुळे विकास कामांची गती मंदावली होती. पुन्हा आमचे सरकार आले आणि राज्याचा वाटा देण्यास सुरुवात केली. परिणामी, कामाला गती प्राप्त झाली आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात महाराष्ट्राला १३ हजार कोटी रुपये रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी दिले आहेत. त्यातून रेल्वे भुयारी मार्ग, रेल्वे उड्डाणपूलांची काम अधिक वेगाने होतील, असेही ते म्हणाले.

नव्या सरकारमुळे विकासाला वेग :  मुख्यमंत्री 

केंद्र आणि राज्य सरकारकडून हातात हात घालून वेगाने विकास कामे केली जात आहेत. आमची ही भरारी अनेकांच्या उरात धडकी भरवणारी आणि अनेकांची झोप उडवणारी आहे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली. सोबतच त्यांनी आपले सरकार २०१९ मध्ये यायला हवे होते. पण, उशिरा का होईना सरकार आले आणि विकासाचा वेग वाढला, असेही विधान केले. ते दूरस्थ प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neglect of infrastructure projects during thackeray tenure deputy chief minister fadnavis alleges ysh