लोकसत्ता टीम
वर्धा : पक्ष फोडाफोडीत भाजपाचा हातखंडा असल्याचे नेहमी बोलल्या जाते. पण आज काँग्रेसने यात एक पाऊल पुढे टाकले आहे. भाजपा नेते दत्ता मेघे यांचे पुतणे व येथील मेघे विद्यापीठाचे मुख्य कारभारी डॉ. उदय मेघे यांनी आज भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हा भाजपापेक्षा मेघे कुटुंबास मोठा धक्का समजल्या जात आहे.
काल बुधवारी या बाबत कुजबुज सूरू होती. कारण वर्धा भाजप अधिवेशन आटोपल्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उदय मेघे हे काय प्रकरण आहे, अशी विचारणा केली होती. त्या नंतर मेघे यांच्या खामला येथील बंगल्यात मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत बैठक झाली, त्यात खुद्द सागर मेघे यांनी उदय पक्ष सोडणार नाही, तसे केल्यास त्याचे आमच्या कुटुंबाशी कायमचे नाते तुटेल, असा विश्वास भाजप नेत्यांना दिला होता.
आणखी वाचा-आई ती आईच! दुरावलेल्या बछड्यांसाठी ‘ती’ ट्रॅपमध्ये शिरली अन्…
उदय मेघे यांनी मात्र कोणतीही तमा न बाळगता काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त आहे. सतत विचारणा केल्यावरही त्यांनी उत्तर देणे टाळले. पण दुपारी चारनंतर बोलू, असा मेसेज त्यांनी पाठविला. काँग्रेस नेते शेखर शेंडे याबाबत म्हणाले की, उदय मेघे यांचा काँग्रेस प्रवेश होणार असल्याची माहिती होती. मी मेघे कुटुंबात विचारणा पण केली, मात्र दुजोरा मिळाला नाही. यावर मी स्पष्ट बोलू शकत नाही, तर भाजप अंतर्गत वर्तुळात वावर असणारे सुधीर दिवे म्हणाले की, असे काहीच होणार नाही. मेघे कुटुंब कायम भाजप सोबतच राहणार.
आणखी वाचा-राजा शरीफच्या बँक खात्यातून रक्कम काढणारा अटकेत
अशी खात्री दिल्या जात असतानाच उदय मेघे यांना काँग्रेस पक्षात आणण्यासाठी कोणी कशी व काय हमी दिली, याची पण चर्चा जोरात सुरू झाली आहे. उदय हे गेल्या तीन वर्षांपासून सामाजिक कार्यात आघाडीवर होते. त्यांचा दानधर्म पण चर्चेत राहिला. त्यांना याबाबत विचारणा केली असतांना १५ दिवस थांबा, उत्तर मिळेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दोन आठवडाभरापूर्वी दिली होती. आज ही घडामोड झाली. मात्र नागपूर व वर्धा जिल्ह्यात भाजपाचा आधार म्हटल्या जाणाऱ्या मेघे साम्राज्यास यामुळे मोठा धक्का बसणार, हे निश्चित. मेघे कुटुंबातील सदस्य भाजप सोडतोच कसा, असा भाजप वरिष्ठांचा विश्वास राहिला. आजच्या या घडामोडीवर मेघे कुटुंबातील किंवा अन्य नेत्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
© The Indian Express (P) Ltd