अमरावती : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) साठी विविध विषयांच्या परीक्षा जाहीर केल्या आहेत. त्यासाठी २८ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत दिली आहे. शुल्क २९ ऑक्टोबरपर्यंत जमा केले जाईल. तर ३० आणि ३१ ऑक्टोबरला ऑनलाइन अर्जात सुधारणा करण्याची मुभा दिली आहे. परीक्षा ६ ते २२ डिसेंबर दरम्यान घेतली जाणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने डिसेंबर २०२३च्या राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षेसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. अधिसूचनेनुसार, युजीसी नेटसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार २८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ugcnet.nta.nic.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जाचे शुल्क २९ ऑक्टोबर रोजी रात्री ११.५० वाजेपर्यंत भरता येईल. शुल्क भरणासह अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची विंडो ३० ते ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ११.५० पर्यंत पुन्हा उघडली जाईल. उमेदवार त्यांच्या ऑनलाइन फॉर्ममध्ये सुधारणा करू शकतील.
हेही वाचा >>> स्पर्धा परीक्षेत अपयश; खचलेल्या तरुणीने उचलले टोकाचे पाऊल…
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा केंद्रांची घोषणा केली जाईल. नवीन शैक्षणिक धोरणात नेट-सेट परीक्षांना महत्त्व दिले असून पीएच.डी करण्याची अट शिथील करण्यात आली आहे. प्राध्यापक पदांच्या नोकऱ्या मिळवण्यासाठी नेट, सेट परीक्षांना आता महत्त्व प्राप्त झाले आहे. पीएच.डी करण्याच्या प्रक्रीयेत बराच वेळ लागत असून या परीक्षा झटपट नोकरी मिळवून देण्यासाठी उपयोगी ठरत आहेत.