केबलच्या दरवाढीमुळे नागरिकांमध्ये रोष
शंभर मोफत वाहिन्यांशिवाय ग्राहकांनी अधिक २५ वाहिन्यांची निवड केली, तर ग्राहकांना थेट २० रुपये नेटवर्क कॅपॅसिटी शुल्क द्यावे लागत आहे. त्यामुळे ग्राहकांना २० रुपयांचा अधिकचा भरुदड सहन करावा लागत आहे.
केंद्रीय दूरसंचार निगम मंडळ (ट्राय) च्या घोषणेनुसार, १ फेब्रुवारीपासून ग्राहकांना १५४ रुपयांत शंभर मोफत वाहिन्या बघता येणार आहेत. मात्र, शंभर वाहिन्यांमध्ये सर्वाधिक बघितल्या जाणाऱ्या वाहिन्या नसल्याने ग्राहकांची मोठी निराशा झाली आहे.
वाहिन्यांनी विविध पॅकेज जाहीर केले आहेत. मात्र, अशा वाहिन्यांचे पॅकेज जवळपास ५० रुपयांच्या घरात आहे. जर तुम्हाला पॅकेजमधील एकच वाहिनी हवी असेल तर त्यासाठी २ रुपयांपासून तर १९ रुपयांपर्यंत शुल्क मोजावे लागणार आहे. ग्राहकांनी सर्वाधिक बघितल्या जाणाऱ्या २५ वाहिन्या निवडल्या तर त्याचे मासिक शुल्क साडेसहाशे रुपयांच्या घरात जाते. तसेच वाहिन्यांची संख्या २५ वर गेली तर अतिरिक्त २० रुपये द्यावे लागतील. हे शुल्क नेटवर्क कॅपॅसिटी शुल्काच्या नावावर वसूल केले जात असल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड रोष आहे. हे नेटवर्क कॅपॅसिटी शुल्क थेट ब्रॉडकस्टर्सला मिळणार असल्याने लोकल कॅबेल ऑपरेटर्सनी यावर आपला आक्षेप नोंदवला आहे. मात्र ट्राय, मल्टी सव्र्हिस ऑपरेटर्स आणि केबल ऑपरेटर्सच्या आपसी वादात ग्राहक भरडला जात आहे. विशेष म्हणजे, ‘नेटवर्क कॅपॅसिटी’च्या २० रुपयांबद्दल चॅनल निवडल्याची प्रक्रिया पूर्ण केल्यावर ग्राहकांना सांगितले जाते. तोपर्यंत ग्राहकांना या अतिरिक्त भुर्दंडाची खबरही नसते.
ट्रायने ब्रॉडकास्टर्स कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी नवे धोरण आणले आहे. यामध्ये आमच्यासारख्या लोकल केबल ऑपरेटर्ससाठी केवळ हमालाची कामे ठेवली आहेत. आम्हाला मिळणाऱ्या महसूल वाटय़ातून काहीच शिल्लक राहत नाही. आमचा व्यवसाय संपुष्टात आण्याचा प्रयत्न केला जात आहे. नेटवर्क कॅपॅसिटी शुल्क ही थेट ग्राहकांची लूट आहे. केबलचा व्यवसाय संपुष्टात आणून जीओ कंपनीला मोठे करण्याचे हे षड्यंत्र आहे.
– सुभाष बानते, अध्यक्ष, महाराष्ट्र केबल ऑपरेटर्स संघटना