अनिल कांबळे
नागपूर : सध्या ‘शेअर्स ट्रेडिंग’मध्ये गुंतवणूक करण्यावर अनेकांचा भर असून अनेकांना ‘ऑनलाइन ट्रेडिंग’ची पुरेशी माहिती नाही. त्याचाच गैरफायदा घेत अनेक सायबर गुन्हेगारांच्या टोळय़ांनी राज्यभर जाळे निर्माण केले असून बनावट संकेतस्थळाद्वारे लाखोंनी फसवणूक केली आहे. राज्यभरात सायबर क्राइमला फसवणुकीच्या हजारो तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
अनेक गुंतवणूकदार ‘शेअर ट्रेडिंग’ करताना संकेतस्थळावरून माहिती गोळा करतात. तसेच ट्रेडिंगबाबत ‘गुगल’वर शोधतात. सायबर गुन्हेगारांनी शेकडो बनावट संकेतस्थळे तयार केली असून त्या माध्यमातून गुंतवणूकदारांना फसवण्याचे कारस्थान करीत आहेत. संकेतस्थळावरील लिंकवर क्लिक केल्यानंतर आपली बँकेची माहिती सायबर गुन्हेगार घेतात. त्यानंतर गुंतवणुकीच्या नावावर लाखोंनी फसवणूक केली जाते.
कशी होते फसवणूक?
सायबर गुन्हेगारांच्या टोळय़ा बनावट संकेतस्थळावर ‘शेअर ट्रेडिंग‘मध्ये महिन्याभरात लाखो रुपये कमवा, अशी जाहिरात देतात. समाजमाध्यमांवर बनावट खाते उघडून अनेकांना मोबाइलवर लिंक आणि संदेश पाठवतात. त्यात गुंतवणूक केल्यास ‘महिन्याभरात दुप्पट पैसे’ असे आमिष दाखवतात. त्यामुळे अनेक जण गुंतवणूक करण्यासाठी स्वत:ची बँक खात्याची माहिती देतात.
१०० रुपयांत नोंदणीचे आमिष
सायबर गुन्हेगारांची टोळी ‘शेअर ट्रेडिंग’मध्ये फसवण्यासाठी ‘लिंक’ पाठवून १०० रुपयांत नोंदणीचे आमिष दाखवतात. अनेकांना विश्वास नसल्यामुळे सुरुवातीला ५ ते १० हजार रुपये गुंतवतात. महिन्याभरात ही रक्कम तिप्पट किंवा चौपट परत केली जाते. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास बसतो. तो मोठी रक्कम गुंतवतो. मोठी रक्कम गुंतवल्यास सायबर गुन्हेगार त्याची रक्कम परस्पर हडप करतो आणि बनावट संकेतस्थळसुद्धा बंद करतो.
शेअर ट्रेडिंग’चे पुरेशी माहिती नसल्यास गुंतवणूक करू नका. कोणत्याही लिंक आणि संकेतस्थळावरून गुंतवणूक करू नका, अन्यथा सायबर गुन्हेगाराच्या जाळय़ात सापडू शकता. कुणाचीही फसवणूक झाल्यास त्यांनी सायबर क्राइममध्ये तक्रार करावी.
– सुकेशिनी लोखंडे, पोलीस अधिकारी, सायबर क्राइम