लोकसत्ता टीम
नागपूर: आर्थिक कोंडीत सापडलेल्या एसटी महामंडळाला ऊर्जित अवस्थेत नेण्यासाठी नवीन बसेस ‘संजीवनी’चे काम करेल, असा विश्वास परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. परिवहन मंत्र्यांनी शुक्रवारी मंत्रालयातील नवीन दालनात प्रवेश करत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांच्याशी अनौपचारिक चर्चा करत कामगारांच्या मुद्यांवरही चर्चा केली.
याप्रसंगी परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, परिवहन सहसचिव किरण होळकर, एसटी महामंडळाचे वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकारी गिरीश देशमुख व इतर अधिकारी उपस्थित होते. करोनाच्या कठीन काळापासून आर्थिक अडचणीमुळे एसटीच्या ताफ्यात नवीन बसेस दाखल झाल्या नाहीत. त्यामुळे जुन्या बसेस नव्या करून त्याद्वारे प्रवासी वाहतूक करण्याचा एसटीचा केविलवाना प्रयोग आता थांबवण्यात आला पाहिजे, असे बरगे यांनी परिवहन मंत्र्यांना सांगितले.
दरम्यान दरवर्षी ५ हजार याप्रमाणे येत्या ५ वर्षात २५ हजार बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल करण्याचे आमचे नियोजन असून यंदा किमान ८ हजार बसेस तफ्यात दाखल होतील, असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी यावेळी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या शिष्टमंडळाशी बोलतांना व्यक्त केला. सध्या २ हजार ६४० नवीन लालपरी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी १ हजार २०० बसेस एसटीच्या ताफ्यात आतापर्यंत दाखल झाल्या. या बरोबरच नव्याने घेतल्या जाणाऱ्या ३ हजार बसेसची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून या बसेस देखील दिवाळी नंतर एसटीच्या ताफ्यात दाखल होण्यास सुरुवात होईल, असेही परिवहनमंत्रयांनी यावेळी बोलतांना शिष्टमंडळाला सांगितल्याचे बरगे म्हणाले.
पाच हजार बसेसची निविदा प्रक्रिया लवकरच…
यावर्षी एसटी महामंडळाकडून आणखी ५ हजार बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे एक वर्षांमध्ये एसटीच्या ताब्यात सुमारे८ हजार नवीन बसेस दाखल होतील, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळाकडे केले.
कर्मचाऱ्यांच्या पीएफ रकमेबाबत म्हणाले..
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली पीएफची रक्कम पीएफ ट्रस्टकडे का भरण्यात आली नाही. त्या मुळे गुंतवणुकी वरील व्याज बुडत आहे असा प्रश्न सुद्धा वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकारी गिरीश देशमुख यांना विचारून सदरची माहिती तत्काळ देण्याच्या सूचनाही सरनाईक यांनी दिल्या. या शिवाय प्रत्येक महिन्याला वेळेवर वेतन देण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊ असे आश्वासनही सरनाईक यांनी यावेळी शिष्टमंडळाशी बोलतांना दिल्याचेही बरगे यांनी सांगितले.