लोकसत्ता टीम
वर्धा : भूगर्भातील जलपातळी खोलवर जाण्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे पुनर्भरण होण्यासाठी वैद्यकीय मंचचे डॉ.सचिन पावडे यांनी शोधलेल्या उपकरणास आंतरराष्ट्रीय पेटंट प्राप्त झाले आहे.
भूगर्भातून पाण्याचा बेसुमार उपसार होत आहे. मात्र त्या तुलनेत पाण्याचे पुनर्भरण होत नाही. त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात महाजलसंकट उद्भवू शकते. हे हेरून डॉ.सचिन पावडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या विषयी अभ्यास केला. त्या संशोधनातून ‘भूजल मॉइस्ट सॉईल’ हे उपकरण तयार केले. प्रथम स्वत:च्या घरात ही यंत्रणा लावली. ती यशस्वी असल्याचे दिसून आल्यावर या यंत्रणेचा लोकांना उपयोग व्हावा म्हणून प्रचार सुरू केला. या उपकरणात गुरूत्वाकर्षण शक्तीचा उपयोग आला आहे. त्यात तीन फिल्टर लावले आहे. परिणामी पावसाच्या पाण्याचे तीनदा शुध्दीकरण झाल्यानंतरच ते भूगर्भात जाते. या यंत्रणेचे त्यांनी देशभरात दोन हजार उपकरणे स्वस्त किंमतीत पाठविली.उपकरणामुळे विहिर व कुपनलिकेला भरपूर जलसाठा मिळाल्याची प्रतिक्रिया असल्याचे डॉ. पावडे सांगतात. मात्र हे यश पाहून काही व्यावसायिकांनी या उपकरणाची नक्कल बाजारात आणली. असे हे नकली उपकरण १५ ते २० हजार रूपये किंमतीत बाजारात विकल्या जात असल्याचे दिसून आले.
आणखी वाचा-नागपूर : त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं, पण तिचा ‘तो’ शब्द ऐकून त्याने जीवनच संपवलं…
ना नफा, ना तोटा या तत्वावर बनविलेल्या उपकरणाचा धंदेवाईक उपयोग होत असल्याचे पाहून डॉ.पावडे यांनी उपकरणाचे पेटंट घेण्याचा निर्णय घेतला. त्याला पावती मिळाली आहे. या भूजल मॉइस्ट सॉईल उपकरणास फेडरल रिपब्लीक ऑफ जर्मनीचे आंतरराष्ट्रीय पेटंट प्राप्त झाले आहे. तसेच भारत सरकारच्या पेटंट कार्यालयातर्फेही राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. आपल्याकडे पारंपारिक पद्धतीने शोष खड्यांच्या माध्यमातून पावसाचे पाणी आणि सांडपाणी जमिनीत मुरविण्याचा प्रयत्न केल्या जातो. मात्र या माध्यमातून पाणी खोलवर जाण्यास खूप विलंब लागतो.
भूगर्भातील जलपातळी खोलवर जाण्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे पुनर्भरण होण्यासाठी वैद्यकीय मंचचे डॉ.सचिन पावडे यांनी शोधलेल्या उपकरणास आंतरराष्ट्रीय पेटंट प्राप्त झाले आहे. त्यातून भूगर्भाची जलपातळी प्रचंड खाली गेल्याचे स्पष्ट होते. अश्या स्थितीत पाण्याचे थेट पूनर्भरण होण्यासाठी विशिष्ट उपकरणाचीच गरज होती. ती डॉ.पावडे यांनी पूर्ण केली असून त्यावर आंतरराष्ट्रीय मोहोर उमटली आहे. आता हे उपकरण लोकांना माफकदरात उपलब्ध होईल. पर्यावरण पूरक कार्याबद्दल डॉ. सचिन पावडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.