राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातचा गुंता अद्याप सुटलेला नसतानाच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहामध्येही अशीच परिस्थिती उद्भवण्याची चिन्हे आहेत. या महामार्गावर काही ठिकाणी वन्यप्राण्यांचे कॉरिडॉर निश्चित असून चौपदरीकरणादरम्यान भुयारी मार्गासाठी अंतर सोडले असले तरी महामार्गावर नवनवे कॉरिडॉर पुढे येत असल्याने वन्यप्राण्यांचे काय, अशी परिस्थिती उद्भवली आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळ कोका वन्यजीव अभयारण्य आहे. दोन्हीला जोडून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा सध्या चर्चेत आहे. पावसाळा व हिवाळ्यात वन्यप्राणी मोठय़ा प्रमाणावर कॉरिडॉर ओलांडून जातात व राष्ट्रीय महामार्ग आडवा येत असेल तर वन्यप्राण्यांचे सर्वाधिक बळीही जातात. नागझिरा अभयारण्यातील प्राण्यांना स्थानांतरण करताना महामार्ग ओलांडावा लागत असल्याने वन्यप्राण्यांची विशेषत: वाघ आणि बिबटय़ांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न उद्भवला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा व चौपदरीकरणाला दशक लोटले असले तरी जे कॉरिडॉर निश्चित झाले तेथे चौपदरीकरण केले नाही व भुयारी मार्गासाठी जागा सोडण्यात आली.
गडेगाव कॉरिडॉर, साकोली व सौँदडमधील नवेगाव अभयारण्याला जोडणारा कॉरिडार नव्याने समोर आले आहेत. अलीकडेच बिबटय़ा मृत्युमुखी पडलेल्या पुतळीफाटा हा कॉरिडार नव्याने समोर आला आहे, पण या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाले आहे. मासुलकसा घाटचा कॉरिडार आधीच निश्चित असल्याने या ठिकाणी चौपदरीकरणादरम्यान भुयारी मार्गासाठी जागा सोडण्यात आली आहे. मात्र, त्याच वेळी देवरीपासून बाघनदीपर्यंत एक-दोन ठिकाण चौपदरीकरण झालेले आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणादरम्यान जेथे कॉरिडॉर निश्चित झाले आहेत तेथे भुयारी मार्गासाठी जागा सोडली, हे खरे. मात्र, जे कॉरिडॉर नव्याने समोर येत आहेत त्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. बिबटय़ाच्या मृत्यूने नव्याने समोर येणाऱ्या कॉरिडॉरवर वनखाते आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एकत्रित तोडगा काढण्याची गरज आहे.
– सावन बाहेकर, मानद वन्यजीव रक्षक, गोंदिया