नागपूर : राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व पेन्शन योजनेचे संरक्षण करावे, या प्रमुख मागणीसाठी ‘व्होट फॉर ओपीएस’ संकल्प यात्रेचे आयोजन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेद्वारा करण्यात आले आहे. संकल्प यात्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीला संविधान चौक नागपूर येथून सुरू झाली. या यात्रेचा समारोप मुंबई येथील आझाद मैदानावर २८ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे.
आतापर्यंत सहा राज्यांतील कर्मचाऱ्यांना ‘ओपीएस’ लागू करण्यात आली आहे. नुकतेच सिक्कीम या राज्यानेसुद्धा जुनी पेन्शन योजना लागू केली. मात्र, महाराष्ट्र राज्य सरकारने केवळ अभ्यास समिती व अहवालावर बोळवण केली आहे. त्यामुळे कर्मचारीवर्गात प्रचंड असंतोष निर्माण झाला. यापूर्वी नागपूर हिवाळी अधिवेशनावर पेन्शन जनक्रांती महामोर्चा काढण्यात आला होता. शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते. तरीसुद्धा अजूनही यावर निर्णय झाला नाही. जे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करतील ते सरकार सत्तेवर स्थापन करण्याचा निर्धार राज्यातील १६ लाख कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
हेही वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात पाणी टंचाईची शक्यता; नऊ तालुक्यांतील भूजलपातळीत घट
नागपूर महाल येथील शिवाजी चौकात सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर सकाळी ११ वाजता संविधान चौकात जाहीर सभा करून या संवाद यात्रेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर व राज्यकार्यकारिणी यांच्या हस्ते झाले. येथील संविधान चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून ‘व्होट फॉर ओपीएस’ या संवादयात्रेत मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले. वितेश खांडेकर, आशुतोष चौधरी, डॉ. अशोक गव्हाणकर, अरविंद अंतुरकर, प्रा. सपन नेहरोत्रा, मिलिंद वानखेडे, प्रकाश भोयर आदींनी जुनी पेन्शन संकल्प पदयात्रेत कर्मचाऱ्यांना संबोधित केले.