नागपूर : पाल म्हंटलं की तिला हाकलण्याच्याच मागे सारे लागतात, पण बाह्य जगात एवढ्या वेगवेगळ्या आणि सुंदर पाली आहेत, की कुणीही त्यांच्या प्रेमात पडावे. संशोधक अशा नवनवीन पालींच्या प्रजाती शोधून काढतात. सातारच्या चाळकेवाडी पठारावर अशाच एका नवीन पालीच्या प्रजातीचा शोध लागला आहे. हा शोध जैवविविधतेच्या संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, या नवीन प्रजातीच्या शोधामुळे महाराष्ट्रातील पठारावरील परिसंस्थेचे महत्त्व अधोरेखित होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालीची ही नवीन प्रजाती स्थानिक, दुर्मिळ आणि संकटग्रस्त प्रजातींसोबत या पठारात आढळते, जसे की अपोनोगेटॉन सातारेंसिस, हेमिडॅक्टायलस सातारेंसिस, सरडा सुपर्बा. तसेच या पठारावर रॅबडॉप्स अक्वाटिकस आणि लाओपेल्टिस कॅलमारिया या सापांच्या जातीही आढळतात आणि राओरचेस्टेस घाटेई या बेडकांचा शोधही या पठारावरूनच लागला आहे. चाळकेवाडी पठार हे बिबटे आणि अस्वलांसाठी येण्याजाण्याचा मार्ग असून स्थलांतरित पक्ष्यांसाठी आणि शिकारी पक्ष्यांसाठी आश्रयस्थान म्हणून महत्वाची भूमिका बजावते.

ही पाल स्थानिक परिसंस्थेच्या संतुलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. कीटकभक्षक म्हणून ती मच्छर, कोळी आणि अन्य किटकांचे प्रमाण नियंत्रित ठेवते, ज्यामुळे पर्यावरण निरोगी राहते. याशिवाय, ही पाल शिकारी पक्षी, साप, आणि लहान सस्तन प्राण्यांसाठी खाद्यसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या अस्तित्वामुळे स्थानिक जैवविविधतेचे अस्तित्व टिकून राहते, म्हणूनच हा शोध जैवविविधता संवर्धनासाठी खूप महत्त्वाचा आहे.

या चाळकेवाडी पठाराचा जैवविविधतेच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात घेतले तरी, वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे येथील परिसंस्था धोक्यात येत आहे. चाळकेवाडी पठार हे बहुतांश खासगी मालकीचे असून येथे वाढते पर्यटन प्रवाह, व्यावसायिक उलाढाल, मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी, लाल मातीसाठी उत्खनन, पठारावरील खडकांचे वाहतूक, आणि पर्यटक वाहने यांमुळे येथील नैसर्गिक अधिवासाचा नाश होत आहे. परिणामी, अनेक स्थानिक प्रजातींना विलुप्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे.पालीच्या या नवीन प्रजातीला इंडोनेशियातील प्रसिद्ध संशोधक डॉ. थसुन अमरसिंघे यांचे नाव देण्यात आले आहे. हे नाव त्यांच्या वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील अमूल्य योगदानाचा सन्मान म्हणून देण्यात आले आहे.

हा शोध पाच वर्षांच्या अथक संशोधनाचा परिणाम असून, भारतीय वन्यजीव शास्त्रज्ञ डॉ. अमित सय्यद, राहुल खोत आणि जयदित्य पुरकायस्थ यांनी केलेल्या मेहनतीचे फळ आहे. या प्रकल्पाचे नेतृत्व डॉ. अमित सय्यद (ब्रीदलाइफ बायोसायन्सेस फाउंडेशन) यांनी केले असून, त्यांनी फील्ड वर्क, प्रयोगशाळा चाचण्या आणि वैज्ञानिक दस्तऐवजीकरणावर कार्य पहिले आहे. त्यांचे हे संशोधन झूटाक्सा (Zootaxa) या न्यूझीलंडमधील आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित शास्त्रीय नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. अमित सय्यद यांनी या आधीही भारतातील विविध जंगलातून बऱ्याच नवीन प्रजातींचा शोध लावला आहे पण विशेष म्हणजे साताऱ्यातून आजपर्यंत त्यांनी चार नवीन प्रजाती शोधून काढल्या आहेत. त्यामध्ये एक बेडूक, एक विंचू आणि दोन पालीचा समावेश आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New pali species discovered on chalkewadi plateau highlights maharashtras biodiversity conservation importance rgc 76 sud 02