बुलढाणा : राज्यात नवीन राजकीय आघाडी तयार करण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याच दृष्टीने तुपकर यांची येत्या २४ जुलै रोजी पुणे येथे महत्त्वाची राज्यस्तरीय बैठक होत आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकांवर चर्चा होणार असून महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने समविचारी राजकीय पक्ष, संघटना यांची मोट बांधून तिसरी आघाडी तयार करण्याचे प्रयत्न तुपकर यांनी चालविले आहे. मध्यंतरी त्यांनी प्रहार संघटनेचे नेते तथा आमदार बच्चू कडू यांच्यासह काही नेत्यांशी संवाद साधला होता. त्या पार्श्वभूमीवर एस.एम. जोशी फाऊंडेशन सभागृह, नवी पेठ, पुणे येथे सकाळी १० वाजता बैठक लावण्यात आली आहे. या बैठकीत विचारमंथन व चर्चा करून शेतकरी चळवळीची पुढील आंदोलनात्मक तसेच राजकीय दिशा ठरविली जाणार आहे. बैठकीत राज्यभरातील चळवळीतील प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.

हेही वाचा – नागपूर: रामझुला हिट अँड रन प्रकरण; रितू मालू म्हणते,‘आत्मसमर्पण नाही…’

आगामी विधानसभा निवडणूक पाहता ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत चळवळीची पुढील दिशा व राजकीय भूमिका यावर विचारमंथन होणार आहे. तसेच या बैठकीत नवी राजकीय घोषणा होण्याचीदेखील शक्यता नाकारता येत नाही. शेतकरी चळवळीचा युवा चेहरा आणि आक्रमक नेतृत्व ही तुपकर यांची ओळख आहे. चळवळीतील नव्या-जुन्या सर्व प्रमुख पदाधिकारी व युवा कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

विधानसभा लढण्याचा निर्णय

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकर यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. तब्बल अडीच लाख मते घेत त्यांनी प्रमुख पक्षांसह राजकीय विश्लेषकांचे लक्ष वेधून घेतले. यामुळे तुपकरांसह त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. तुपकर यांनी काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बुलढाणा येथील गोलांडे लॉन्स येथे पार पडलेल्या बैठकीत बुलढाणा जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांत उमेदवार उभे करण्याची घोषणा त्यांनी केली होती. प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तुपकरांना विधानसभा निवडणूक लढण्याचा आग्रह केला. त्यामुळे संपूर्ण ताकदीनिशी बुलढाणा जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांत निवडणूक लढवायची, असा निर्धार करून त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला होता. मात्र, स्वतः कोणत्या मतदारसंघातून लढणार हे गुलदस्त्यात ठेवले होते.

हेही वाचा – रोजगार संधी, प्रदुषण मुक्ती, अन् बरेच काही, अर्थसंकल्पाकडून वैदर्भीयांना या आहेत अपेक्षा

राजकीय भूमिकेकडे लक्ष

आता रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात पुणे येथे राज्यस्तरीय बैठक होऊ घातली आहे. राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणारी ही बैठक आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या बैठकीत तुपकर शेतकऱ्यांच्या नवीन आंदोलनाची घोषणा करतात की विधानसभेच्या दृष्टिकोनातून संभाव्य आघाडी, राजकीय भूमिका जाहीर करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New political alliance in maharashtra ravikant tupkar meeting of office bearers in pune scm 61 ssb