लोकसत्ता टीम
नागपूर: तामिळनाडूतील थुतुकुडी (तुतिकोरीन) जिल्ह्यातून पर्णरेषी बोटांच्या पालीच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात भारतातील संशोधकांना यश आले आहे. ‘हेमिडॅक्टिलस क्वार्टझाइटीकोलस’ (क्वार्टझाइट ब्रुकीश गेको) असे तिचे नामकरण करण्यात आले.
पृष्ठभागाला धरून ठेवण्यासाठी आवश्यक असणारे बोटांवरील पातळ थर (लॅमेले) विभागलेले असल्यामुळे या प्रजातीचा समावेश ‘हेमिडॅक्टिलस’ या पोटजातीत केला आहे. तसेच गारगोटीसदृश्य खडकांच्या (क्वार्टझाइट) अधिवासात आढळत असल्यामुळे या प्रजातीला ‘क्वार्टझाइटीकोलस’ असे नाव दिलेले आहे. या संशोधनामधे ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे, ईशान अग्रवाल, स्वप्निल पवार, सत्पाल गंगलमाले, विवेक वाघे आणि रेप्टाईल कॉन्झर्वेशन ऑफ इंडियाचे रामेश्वरम मरीआप्पन यांचा समावेश आहे.
आणखी वाचा-अकोला: वाद विकोपाला गेला अन् मुलाने वडिलांच्या डोक्यात घातला दगड
‘हेमिडॅक्टिलस’ या पोटजातीतील पालींच्या बोटांच्या खाली असणारे ‘लॅमेले’ वृक्षांच्या पानांवर असणाऱ्या रेषांशी साधर्म्य साधतात. म्हणून त्यांना मराठीमध्ये ‘पर्णरेषी बोटांच्या पाली’ असे संबोधले आहे. घरांमध्ये भिंतीवर दिसणाऱ्या पाली याच पोटजातीत सामावलेल्या आहेत. ‘हेमिडॅक्टिलस क्वार्टझाइटीकोलस’ ही प्रजाती घरांमध्ये सापडणाऱ्या छोट्या आकाराच्या ‘ब्रुकीश’ पालींच्या गटात मोडते. तिचे जवळचे भाऊबंद ‘हेमिडॅक्टीलस ग्लेडोई’ हे यांच्यापासून साधारणतः ८०० किलोमीटर उत्तरेकडून मध्य भारत आणि पाकिस्तानातून ज्ञात आहेत. ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनकडून सुरू असलेल्या भारतीय द्वीपकल्पामधील पालींच्या सर्वेक्षणादरम्यान ही पाल प्रथमतः आढळली. पाठीवरील ट्युबरकलची वैशिष्टपूर्ण रचना आणि त्यांचा आकार यांवरून प्रथमदर्शनीच ही पाल इतर कोणत्याही ‘हेमिडॅक्टिलस’ पोटजातीतील प्रजातींपेक्षा अत्यंत वेगळी असल्याचे लक्षात आले. जनुकीय संच आणि आकारशास्त्राच्या सखोल अभ्यासाअंती ही प्रजाती जगातील इतर ज्ञात असलेल्या पालींच्या प्रजातींपेक्षा स्पष्टपणे वेगळी असल्याचे सिद्ध झाले.
तज्ज्ञांच्या पुष्टीनंतर सदरचा शोधनिबंध जर्मनीमधून प्रकाशित होणाऱ्या ‘व्हर्टिब्रेट्स झूलॉजी’ या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकेमधून प्रकाशित झाला. या अभ्यासामध्ये ‘हेमिडॅक्टिलस क्वार्टझाइटीकोलस’ ही प्रजाती थुतुकुडी जिल्ह्यातील ४० किमी अंतरावरील दोन टेकड्यांवरून नोंदवण्यात आली.
आणखी वाचा- बुलढाणा: अहिल्यादेवी होळकर पुरस्कार आता ग्रामपंचायत स्तरावरही, दोन महिलांचा करणार सन्मान
या नव्या प्रजातीच्या पाली शुष्क पानझडी वनांनी व्यापलेल्या छोट्या टेकड्यांवरील ‘क्वार्टझाइट’च्या खडकांवरती सापडतात. या टेकड्यांची समुद्रसपाटीपासूनची उंची ३५० मीटरपेक्षा कमी आहे. ही प्रजाती निशाचर असून छोटे कीटक हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे. ‘क्वार्टझाईट’च्या उघड्या खडकांवरती भक्ष्य पकडण्यासाठी, या पाली रात्री बाहेर पडतात आणि दिवसा खडकांच्या भेगांमध्ये विश्रांती घेतात. पालींच्या या नव्या शोधामुळे, शुष्क पानझडी वनांनी व्यापलेल्या छोट्या टेकड्यांच्या आणि ‘क्वार्टझाइट’ खडकांच्या अधिवासाचे महत्त्व नव्याने अधोरेखित झालेले आहे. -अक्षय खांडेकर, संशोधक, ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन.