• परिवहन विभागाकडून साध्या कागदावर प्रिंट देण्यास हिरवा कंदील
  • मुख्यमंत्र्यांच्या शहरातील कार्यालयाला केवळ ५ हजार कागद

महाराष्ट्रात जानेवारी-२०१६ पासून नवीन वाहनांना नोंदणी प्रमाणपत्र (आर.सी.) देण्याचे काम बंद असून त्याशिवाय वाहने रस्त्यांवर धावत असल्याचा प्रकार ‘लोकसत्ता’ने पुढे आणला होता. परिवहन विभागाने त्यावर उपाय म्हणून साध्या कोऱ्या कागदावर प्रिंट करून आर.सी. देण्याला सुरुवात केली आहे. त्याकरिता परिवहन विभागाने राज्याच्या प्रत्येक परिवहन कार्यालयाला कागद उपलब्ध करून दिली असली तरी नागपूरसह काही कार्यालयाला फार कमी कागद मिळाल्याने ते संपताच हा गोंधळ कायम राहणार आहे.

सगळ्याच संवर्गातील वाहनांशी संबंधित कामे राज्याच्या परिवहन विभागाच्या अखत्यारित येतात, परंतु या विभागाकडून जानेवारी-२०१६ पासून नागपूर शहर वगळता राज्यातील इतर कोणत्याच भागात वाहन नोंदणी प्रमाणपत्र दिले नसल्याची माहिती ‘लोकसत्ता’ने पुढे आणली होती. पूर्वी या विभागाकडून वाहन नोंदणी प्रमाणपत्र ‘स्मार्ट कार्ड’च्या स्वरूपात दिले जात होते. त्यासाठी एका खासगी कंपनीशी परिवहन विभागाने करार केला होता, परंतु २०१४ च्या शेवटी तो संपला. नंतर या कंपनीला ६ महिने मुदतवाढ देण्यात आली, पण २०१५ मध्ये ती संपली. राज्यभरात वाहन नोंदणी प्रमाणपत्रांची यादी फुगत असल्याचे बघून परिवहन विभागाने ‘स्मार्ट कार्ड’ बंद करून शेवटी स्वत: वाहन नोंदणी प्रमाणपत्रे छापून देणे सुरू केले. काही महिन्यातच कागद संपल्याने तेही बंद झाले. त्यानंतर २०१५ च्या शेवटी नागपूरच्या श्री प्रिंटर्स या कंपनीला राज्यभरात वाहन नोंदणी प्रमाणपत्रे पुरवण्याचे कंत्राट मिळाले. या कंत्राटदाराला एका कागदावर दोन प्रमाणपत्रे देण्याची मागणी परिवहन विभागाकडून झाली, परंतु त्याने स्पष्ट नकार देऊन जिल्हा न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने यावर ‘जैसे थे’ आदेश दिले. तेव्हा यापूर्वी पुरवलेली छापील वाहन नोंदणी प्रमाणपत्रे विविध प्रादेशिक परिवहन कार्यालये व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात संपली. प्रमाणपत्रे नसल्याने जानेवारी २०१६ पासून राज्यभर हळूहळू वाहन नोंदणी प्रमाणपत्रे, वाहनांचे हस्तांतरण प्रमाणपत्रांसह इतर प्रमाणपत्रे देण्याचे कामच बंद झाले.

नागपूरला प्रमाणपत्र उपलब्ध असल्याने जुलैपर्यंत हे काम चालले, परंतु कागद संपल्याने येथेही काम बंद पडले. परिवहन विभागाचा गोंधळ ‘लोकसत्ता’ने पुढे आणला. त्यावर बैठक घेत परिवहन आयुक्तांनी साध्या कागदावर प्रिंट करून प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली. त्याकरिता राज्यभरातील परिवहन कार्यालयांना कागदाचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यात नागपूरसह राज्यातील लोकसंख्या जास्त असलेल्या शहरांना केवळ ५ हजाराच्या जवळपास कागद उपलब्ध झाल्याने ते संपताच पुन्हा हा गोंधळ कायम राहणार असल्याचे चित्र आहे. नागपूर शहरात नागपूर शहर व पूर्व नागपूर असे दोन कार्यालये असल्याने येथे सर्वात आधी तुटवडा सुरू होऊन प्रमाणपत्र निर्मिती बंद होणार, हे विशेष.

तक्रारी मिळाल्या

वाहन नोंदणी प्रमाणपत्र संपल्याने राज्यात साध्या कोऱ्या कागदावर हे प्रमाणपत्र दिले जात आहे. नागपूरसह राज्याच्या काही परिवहन कार्यालयात फार कमी कागदांचा पुरवठा झाल्याच्या तक्रारी कार्यालयाला मिळाल्या. तातडीने कागदपत्रांचा पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील सामान्य वाहनधारकांना त्रास होऊ नये यासाठी परिवहन विभाग प्रयत्न करेल.

– डॉ. प्रवीण गेडाम, परिवहन आयुक्त, महाराष्ट्र

Story img Loader