लोकसत्ता टीम
अकोला: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) पर्यावरण अनुकूल उपाययोजनांची सांगड घालून शेती विकास केला जातो. अकोला जिल्ह्यात याच अभियानात कान्हेरी सरप येथे अडीच एकर क्षेत्रात संत्रा बाग लागवड साकारली असून यातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा मार्ग गवसला आहे.
जिल्ह्यात २०० हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट असून त्यात सीताफळ, चिकू, संत्री, मोसंबी, लिंबू अशा फळपिकांना शेतकऱ्यांची पसंती आहे. जिल्ह्यातील कान्हेरी सरप येथे दिनेश महादेव ठाकरे यांनी आपल्या पूर्वापार शेती पद्धतीत बदल करत, पारंपरिक पिकांसोबत फळबाग लागवडीचा पूरक पर्याय निवडला. त्यासाठी त्यांना बार्शीटाकळी तालुक्याच्या कृषी कार्यालयामार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेतून अनुदान मिळाले. त्यातून त्यांनी अडीच एकर क्षेत्रात संत्रा फळ पिकाची लागवड केली. पारंपरिक सोयाबीन, कापूस, हरभरा या पिकांच्या जोडीला त्यांनी फळबाग लागवड केल्याने त्यांना हवामानाच्या लहरीपणामुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानाची भरपाई फळबागेच्या उत्पन्नातून होणे अपेक्षित आहे. शिवाय फळझाडांच्या माध्यमातून परिसर वृक्षाच्छादित होतो, ही बाबही पर्यावरणास अनुकूल ठरते.
आणखी वाचा- सावधान..! नागपुरात ‘वर- वधू’च्या भेटवस्तू पळवणारे चोरटे सक्रिय
यापूर्वी त्यांनी शेतात अडीच एकर क्षेत्रावर दहा वर्षांपूर्वी पेरूची बाग लावली होती. पेरूच्या झाडांपासून मिळणारे फळांचे उत्पादन त्यांना वेळोवेळी आर्थिक नडीचा सामना करण्यास सहाय्यभूत ठरले. त्यामुळे त्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अनुदानातून संत्रा बाग लागवड करण्याचे ठरवले. आता त्यांची बाग चांगलीच भरभराटीला आहे. शेंदूरजना घाट येथील रोपवाटिकेतून त्यांनी जातिवंत संत्रा रोपे आणली व लागवड केली. आता या रोपांना दोन वर्षे झाली आहेत. आणखी तीन वर्षांनी प्रत्यक्ष उत्पादन येण्यास सुरुवात होईल. त्यांनी ही संपूर्ण बाग ठिबक करून वाढवली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी अभियानाचे दोन वर्षाचे अनुदान ठिबकसह त्यांना प्राप्त झाले. शिवाय कृषी विभागाने वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शनही केले. त्याचा बाग फलद्रूप होण्यासाठी लाभ झाला, असे दिनेश ठाकरे यांनी सांगितले.
समृद्धीचा लाभ मिळणार
अकोला-बार्शीटाकळी मार्ग पुढे समृद्धी महामार्गाला मिळतो. त्यामुळे बाजारपेठेत माल वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होणार आहे. कारंजा, वाशीम येथील व्यापारी हा माल खरेदी करतील आणि समृद्धी महामार्गाद्वारे अन्य मोठ्या शहरात पोहोचवतील. समृद्धी महामार्गाचा हा फायदा परिसरातील सर्वच शेतकऱ्यांना होईल. बाजारपेठेला जोडणारे वेगवान दुवा समृद्धी महामार्गामुळे मिळणार आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी सांगितले.