५ ते ११ हजार रुपये  प्रवेश शुल्क

सरत्या वर्षांला निरोप आणि नव्या वर्षांचे स्वागत करण्यासाठी शहरातील तारांकित हॉटेल सज्ज झाली आहेत. यंदा नागपूरकरांना सेलिब्रेशनसाठी गेल्यावर्षीच्या तुलनेत जादा पसे मोजावे लागणार आहे.

नवीन वर्षांनिमित्त बाहेर जेवायला जाण्याची जणू स्पर्धा तरुणाईत बघायला मिळते. त्यासाठी त्यांचे नियोजन सुरू असून एका आठवडय़ावर येऊन ठेपलेल्या नववर्षांच्या जल्लोषासाठी त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोणत्या हॉटेलमध्ये हा विशेष दिवस साजरा करायचा, याचा बेत आखला जात आहे. शहरात बोटावर मोजण्याइतकी मोठी  तारांकित हॉटेल असून या सर्व हॉटेलांमध्ये सध्या नववर्ष साजरा करण्यासाठी नोंदणी सुरू आहे. जोडप्याने किंवा एका व्यक्तीसाठी विशेष पॅकेज ठरवण्यात  आले आहे. यामध्ये चवदार भोजन, डिजे आणि लाईव्ह बॅण्ड तसेच मद्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, सर्व तारांकित हॉटेल मालकांनी आपल्या सोयीनुसार केवळ तीन तासांच्या जल्लोषासाठी विविध दर ठेवले आहे.

वर्धा मार्गावारील हॉटेल रेडिसन ब्ल्यूने एका जोडप्यासाठी तब्बल अकरा हजार रुपये प्रवेश शुल्क ठेवले असून यामध्ये सारेगामा फेम गीतकार संदीप बत्रा यांचे लाईव्ह कॉन्सर्ट असणार आहे. सोबतच डिजे आणि भोजनासह मद्याची व्यवस्था असेल, तर जोडप्यासह एका व्यक्तीला प्रवेश मिळणार असून त्यासाठी जागा सहा हजार रुपये मोजावे लागणार आहे. त्यामुळे या हॉटेलमध्ये सेलिब्रेशनासाठी जाणाऱ्यांना आपला खिसा रिकामा करावा लागणार आहे, तर हॉटेल लि मेरिडियनमध्ये एका जोडप्याला आठ हजार रुपये द्यावे लागतील. येथे वीस लाईव्ह फूड काऊंटर सजावण्यात येणार असून अमर्याद भोजन आणि मद्याची व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच छोटय़ा मुलांसाठी किड्स् झोन तयार करण्यात आले आहे. शिवाय डिजेची व्यवस्था असणार आहे. हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये त्रिशून नावाचा मुंबईचा डिजे विशेष सेलिब्रेशनसाठी येणार असून येथे एका जोडप्याला पाच हजार रुपये जेवणासाठी मोजावे लागतील. मात्र मद्यासाठी वेगळे पसे मोजावे लागणार आहे, तर एकटय़ा मुलीला तीन तर एका मुलासाठी साडेतीन हजार रुपये जेवणासह प्रवेश शुल्क आकारण्यात आले आहे. हॉटेल प्राईडमध्ये एक जोडप्याला पाच हजार रुपये शुल्क भरून डिजे आणि भोजनाचा आस्वाद घेता येईल.

असे आहेत दर

  • हॉटेल रेडिसन ब्ल्यू – ११ हजार
  • हॉटेल लि मेरिडियन – ०८ हजार
  • हॉटेल सेंटर पॉईंट – ०५ हजार
  • हॉटेल प्राईड – ०४ हजार

Story img Loader