वर्धा : मध्य रेल्वेचे मुंबईस्थित महाव्यवस्थापक नरेश लालवानी आज सकाळी दौऱ्यावर येणार म्हणून माहिती फुटली. विभागाचा सर्वात बडा अधिकारी येणार व त्याची कानोकान माहिती नाही म्हणून काहीजण खबरदार झाले. सर्वात प्रथम केंद्राचा विषय म्हणून खासदार रामदास तडस यांच्या कार्यालयाने दखल घेतली. खासदारांना पूर्वसूचना का देण्यात आली नाही, म्हणून स्थानिक रेल्वे प्रशासनास विचारणा झाली. ते हडबडले. वेळेवर दौरा ठरला म्हणून कळवू शकलो नाही वगैरे, वगैरे.
हेही वाचा – उपराजधानीसह विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज, शेतकरी चिंतेत
हेही वाचा – चंद्रपूरच्या जंगलात आढळला औषधीयुक्त गुणांचा अतिशय दुर्मिळ पिवळा पळस
रेल्वे समितीचे अशासकीय सदस्यही याबाबत अनभिज्ञच होते. मात्र, वरिष्ठाच्या दौऱ्याबाबत अशी उलटसुलट चर्चा होत असल्याचे दिसून आल्यावर रेल्वेच्या नागपूर विभागीय अधिकाऱ्यांनी दक्षता घेत खासदार कार्यालयास कळविले की, लालवानी हे सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी येत असून आज ते या मार्गावरील प्रमुख रेल्वे स्थानकांना भेट देणार आहे. सेवाग्राम स्थानक हे विशेष योजनेत असल्याने त्या ठिकाणी सकाळी दहा वाजता थांबतील. यात कोणाला डावलण्याचे काहीच कारण नाही. कृपया अन्यथा घेऊ नये, अशी विनंती झाली अन कार्यालयानेही खासदारांना बाब कळवून टाकली. त्यानंतर स्थानिक रेल्वे प्रशासनाचाही जीव भांड्यात पडला.