मर्जीतील संस्थांच्या घुसखोरीचा वनखात्याचाही प्रयत्न
निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत जागतिक पातळीवरील आययुसीएन या संस्थेच्यावतीने निसर्ग संवर्धनाच्या प्रकल्पांसाठी निधी दिला जातो. मात्र, हा निधी शासनासोबतच स्वयंसेवी संस्थांना दिला जात असल्याने वनखात्याकडून त्यांच्या मर्जीतील स्वयंसेवींचा या प्रकल्पांमध्ये केला जाणारा शिरकाव सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
आययुसीएनच्यावतीने पक्ष्यांच्या संवर्धनासाठी जेवढे प्रयत्न केले जातात, तेवढेच कॉरिडॉर संवर्धनासाठीसुद्धा केले जातात. त्यातूनच वाघांच्या अधिवासाची सुरक्षितता आणि निसर्ग विकासाच्या प्रकल्पांसाठी आययुसीएनएकडून निधी वितरित केला जातो. मात्र, त्यासाठी एक परिपूर्ण अहवाल आययुसीएनला सादर करावा लागतो आणि अहवालाच्या संपूर्ण चाचपणीनंतरच निधी देण्यावर शिक्कामोर्तब केले जाते. यापूर्वी महाराष्ट्र सरकार परिपूर्ण अहवाल सादरीकरणात अयशस्वी ठरले आणि आययुसीएनच्या निधीपासून मुकले. त्यामुळे यावर्षी आययुसीएनच्या आवाहनानंतर राज्याच्या वनखात्याने कंबर कसली. स्वयंसेवींना सोबत घेऊन व्याघ्र संवर्धनासाठी काम करण्याचे ठरवले आणि त्यांची एक बैठक वनखात्याच्या नागपूर मुख्यालयात आयोजित केली. प्राथमिक अहवाल सादरीकरणानंतर आययुसीएनकडून प्राथमिक मंजुरी मिळाली. त्यामुळे निधीचा ओघ पाहता काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीतील संस्थांना या प्रकल्पात घुसवण्याचा प्रयत्न केला. वन्यजीव कॉरिडॉरमध्ये ज्यांनी आयुष्यात काम केले नाही, अशा स्वयंसेवींना या अधिकाऱ्यांनी प्रकल्पात सहभागी करून घेण्यात आले. विशेष म्हणजे, पुण्यातील एका संस्थेने मेळघाटमधील कॉरिडॉरमध्ये काम करण्याची तयारी दर्शवून कोणकोणती कामे करावी लागतील, हे सांगितले. आययुसीएनकडून भरघोस निधी मिळत आहे, हे लक्षात आल्यानंतर कॉरिडार संवर्धनासाठी ज्यांनी कधी कामे केली नाहीत अशाही स्वयंसेवी संस्थेच्या उडय़ा पडायला लागल्या आहेत. आययुसीएनकडून दिला जाणारा निधी हा कॉरिडॉर संवर्धनासाठी आहे, पण मानद वन्यजीव रक्षकपदावर असणाऱ्या आणि व्याघ्र प्रकल्पात रिसॉर्टचा व्यवसाय करणाऱ्या काही स्वयंसेवींनी चक्क रोजगार निर्मिती आणि गावाचा आर्थिक स्तर उंचावण्याच्या वल्गना केल्या आहेत. आययुसीएनच्या मुळ उद्देशाला हरताळ फासण्याचा हा एक प्रयत्न आहे. वनखात्याच्या सहकार्याने त्यांनीच कॉरिडॉरसाठी काम करणाऱ्या संस्थांचीच निवड करणे अपेक्षित असताना मर्जीतील संस्थांची निवड केल्याचे दिसून आले आहे.
.. यांचे काम काय?
सँच्युरी एशिया ही कॉरिडॉर संवर्धनात काम करणारी संस्था नाही, तर वन्यजीवविषयक मासिक प्रकाशित करणारी संस्था आहे. रोटरी क्लब ऑफ नागपूर ग्रीन सिटीनेसुद्धा कॉरिडॉर संवर्धनात कधी काम केलेले नाही. मात्र, वनखात्यातील काही अधिकाऱ्यांच्या मर्जीतील या संस्था असल्याने त्यांचा यात शिरकाव करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
अन्य कॉरिडॉरचा समावेश
आययुसीएनने यापूर्वी भारतीय वन्यजीव संस्थानने सुचवलेल्या मेळघाट-पेंच, पेंच-नागझिरा आणि नागझिरा-ताडोबा, अशा तीनच कॉरिडॉरसाठी प्रकल्प सादर करण्यास सांगितले. मात्र, राज्यातील इतरही कॉरिडार कसे महत्त्वपूर्ण आहेत आणि त्यावर काम करणे आवश्यक असल्याचे पटवून दिल्यानंतर बोर-ताडोबा, पेंच-बोर, मेळघाट-बोर या कॉरिडॉरचा त्यात समावेश करण्यात आला.