नागपूर : ऑर्गनिक पावरडच्या नावाखाली औषधी विक्रेत्याची १६ लाखांनी फसवणूक करणाऱ्या नायजेरीयन टोळीला सायबर पोलिसांनी अटक केली. कारवाई दरम्यान नायजेरियन आरोपीने पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी नायजेरीयन आरोपीला पकडले, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांनी पत्रपरिषदेत दिली.
चिनोन्सो न्वाकोहो राफेल (३७) रा. नायजेरीया असे मुख्य आरोपीचे नाव असून त्याचे साथिदार लक्ष्मण बागवे, शकील अहमद दोन्ही रा. ठाणे आणि बबलुकुमार शर्मा, रा. इंदोर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी चिनोन्सो याचे बँक खाते गोठविले असून ६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याशिवाय नायजेरीयातील बँकेत जवळपास ९ लाख रुपये आहेत. ती रक्कमसुद्धा गोठविण्यात आली आहे. मुंबईच्या सीबीआय कार्यालयात त्याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल असून नायजेरीयाचे पासपोर्ट सीबीआय कार्यालयाकडे जप्त आहे. त्याच्याकडे टीनी अगस्तीन या नावाने लिबेरीयाचा पासपोर्ट मिळून आला. त्याच्याकडून सात मोबाईल, एक लॅपटॉप, बिलबुक डायरी, तसेच लिबेरीयाचा पासपोर्ट पोलिसांनी जप्त केला.
भारतातील तरुणीशी लग्न
चिनोन्सो हा पाच वर्षांपूर्वी भारतात आला. त्याने येथील वैशाली ऊर्फ स्टेफी नावाच्या मुलीशी लग्न केले. त्याला एक मुलगीसुद्धा आहे. तो कपड्याच्या व्यवसाय करायचा. नंतर तो सायबर गुन्हेगारीकडे वळला. या गुन्ह्यात त्याने पत्नीलाही जोडले. फसवणुकीची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात जमा करण्यासाठी त्याने इतर आरोपींना पैशाचे आमिष दाखविले. चिनोन्सो आणि त्याची पत्नी वैशाली हे दोघेही लोकांना फसवित होते तर लक्ष्मण, शकील आणि बबलू कुमार हे तिघे बँक खाते उघडून त्यात फसवणुकीची रक्कम जमा करीत होते. तांत्रिक तपासाच्या आधारे चिनोन्सो याचे लोकेशन घेतले आणि आरोपीला अटक केली. ही कामगिरी सायबर ठाण्याचे ठाणेदार अमित डोळस, कर्मचारी मारूती शेळके, शैलेश, पराग, चंद्रशेखर, प्रिया यांनी केली.
हेही वाचा – सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची दीक्षाभूमीवर परेड, ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन
अशी झाली फसवणूक
निलेश जिवतोडे (उज्ज्वलनगर, झिंगाबाई टाकळी) यांचे लाईफलाईन या नावाने औषधीचे दुकान आहे. औषधी विक्रीबरोबर त्यांचे एक्सपोर्टचेही काम आहे. चिनोन्सो याने ६ सप्टेंबरला निलेशला ऑर्गनिक पावडरची मागणी केली. तसेच हे पावडर भारतात कुठे मिळते, त्याचीसुद्धा माहिती दिली. निलेशने मुंबईतील वैशालीकडून १ लाख ८५ हजार रुपयाचे पावडर खरेदी केले, तशी माहिती चिनोन्सोला दिली. चिनोन्सो नागपुरात पावडर पाहण्यासाठी आला. सौदा करून १०० किलोची ऑर्डर दिली. त्यानुसार निलेशने मुंबईत वैशालीशी संपर्क साधून १५ लाख ८५ हजार रुपयांची ऑर्डर दिली. वैशालीने ९ पाकिटात पावडरऐवजी माती भरून निलेशला पाठवून फसवणूक केली.