गोंदिया : गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळावर नाइट लॅन्डिंगची सुविधा आय एल एस (इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम) यंत्रणा काढल्याने बंद झाली होती. ही यंत्रणा आता पूर्ववत लावण्यात आली असून सर्व हवामान ऑपरेशन आणि इंन्सट्रूमेंट फ्लाइट रूल्स (आईएफआर) करिता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने परवानगी दिली आहे. त्यामुळे कमी दृश्यतामान व खराब वातावरणात आणि रात्रीच्या वेळेस बिरसी विमानतळावर विमान उतरविणे शक्य होणार आहे.

ही यंत्रणा लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी यासाठी खा. प्रफुल्ल पटेल, भारतीय विमान प्राधिकरण व्यवस्थापन व बिरसी विमानतळ येथील अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. अनेकदा वातावरणात बदल होत असतो. अशावेळी बिरसी विमानतळावर विमान उतरवायचे की नाही असे प्रसंग अनेकदा निर्माण झाले होते. पण आता यावर कायम स्वरूपी मार्ग निघाला आहे.

आता वातावरण खराब असले तरी बिरसी विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) द्वारे सर्व हवामान ऑपरेशनची परवानगी मिळाली आहे. तसेच इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम (आयएलएस) ही यंत्रणा कार्यान्वित झाल्याने या विमानतळावर रात्री सुद्धा विमान उतरविणे शक्य झाले आहे. यामुळे बिरसी विमानतळा वरून प्रवासी विमान वाहतूक सेवेला सुद्धा बळ मिळणार आहे.

तर लवकरच या विमानतळावर कैट १ अप्रोच लायटिंग सिस्टम लावण्यात येणार आहे. त्यामुळे ८०० मीटर दृश्यतामानात विमानतळा वर लॅन्डिंग करणे शक्य होणार आहे. तसेच ९०० मीटर दृश्यता मानातही बिरसी विमानतळावर नाईट लॅन्डींग शक्य होईल.विमानतळाच्या धावपट्टीच्या क्षेत्रात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करणाऱ्या विमान कंपन्यांना सुद्धा याची मदत होणार आहे. त्यामुळे गोंदिया जिल्हावासीयां करिता सुद्धा ही दिलासा दायक आणि आनंदी बाब आहे.

गोंदिया-इंदूर विमान सेवा एप्रिलपासून

बिरसी विमानतळावरून एप्रिलपासून गोंदिया-इंदूर प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू केली जाणार आहे. यासाठी एका खासगी विमान कंपनीने कंत्राट घेतले आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्यातील प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.

बिरसी विमानतळ येथे सर्व हवामान ऑपरेशन सुविधा झाल्यामुळे खराब वातावरणात व नाइट लॅन्डिंग करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आता विविध विमान कंपन्या या विमानतळाचा उपयोग करू शकतात. तसेच भविष्यात या विमानतळावर विविध मार्गांवर प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्यास यामुळे मदत होणार आहे. बिरसी विमानतळासाठी ही महत्त्वपूर्ण बाब आहे. – गिरीशचंद्र वर्मा, बिरसी विमानतळ संचालक