लोकसत्ता वार्ताहर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रपूर : ‘वाघांचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स आहेत. या ठिकाणी २०० ते ३०० लोकांच्या ‘नाईट पार्ट्यां’चे आयोजन केले जाते. वाढदिवस, बॅचरल पार्टी, साखरपुडा तसेच इतरही कार्यक्रम येथे होत असतात. यामुळे दिवसा पर्यटक, तर सायंकाळी व रात्री होणाऱ्या पार्ट्या वन्यप्राण्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. यातील काही पार्ट्यांमध्ये पहाटेपर्यंत ‘डीजे’चा दणदणाट सुरू असतो. यामुळे ग्रामस्थही त्रासले आहेत.

ताडोबातील पद्मपूर वेशीला लागून असलेल्या रिसॉर्ट्स आणि हॉटेल्समध्ये रात्री उशिरापर्यंत ‘डीजे’चा दणदणाट सुरू असतो. मात्र, वनविभाग व पोलीस प्रशासन याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. ताडोबाच्या बफर क्षेत्राला लागून असलेल्या मूल मार्गावरील बोर्डा, जुनोना, लोहारा, कोळसा गेट, पद्मपूर मार्गावर अनेक हॉटेल्स, रिसॉर्ट्स, ढाबे आहेत. जिथे रात्री उशिरापर्यंत पार्ट्या सुरू असतात. यामुळे वन्यजीव तसेच गावकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. याबाबत जागरूक नागरिक व ग्रामस्थांनी वनविभागाकडे अनेक तक्रारी केल्या, मात्र कारवाई झाली नाही.

आणखी वाचा-“महायुतीत तोंड दाबून बुक्क्यांचा मार..”, अभिजीत अडसूळ यांची राणा दाम्पत्यावर टीका

‘या गोंगाटामुळे आम्हालाचा त्रास होतो, तर वन्यप्राण्यांचे काय हाल होत असेल. पण आम्ही कर्मचारी आहो, कारवाईचे अधिकार वरिष्ठांकडे आहे,’ असे पद्मापूर तपासणी केंद्रावरील कर्मचारी सांगतात. ‘आम्ही डीजे लावत नाही, जे पार्टीचे आयोजन करतात, ते डीजे आणतात आणि तिथेच नाचतात. यात आम्ही काहीच करू शकत नाही,’ असे सांगून रिसॉर्ट्स संचालक आपली जबाबदारी झटकतात.

तक्रारी करूनही कारवाई नाही

बोर्डा गावातील काही रिसॉर्ट्स व हॉटेल्समध्ये तर दररोज वाढदिवस, साखरपुडा, बॅचरल पार्टी, असे कार्यक्रम होत असतात. तिथेही नाचगाण्यांचा गोंगाट असतो. तक्रारी करूनही कारवाई होत नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वनविभाग झोपेत आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या धांगडधिंग्यामुळे ग्रामस्थ वैतागले आहेत. अनेकदा तक्रारी केल्या, मात्र वनविभागाचे अधिकारी जागे झाले नाही. कॅम्पसमध्ये वाघ, बिबट्यासारखे वन्यप्राणी फिरत असल्याचे त्यांना माहीत आहे. असे असूनही कारवाई होत नसेल तर त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची, अशा शब्दात पद्मापूर गावातील एका जबाबदार व्यक्तीने रोष व्यक्त केला.

आणखी वाचा-वाघाचा अपघातात मृत्यू, आईपासून दुरावला अन्…

बफर उपसंचालकांनी आरोप फेटाळले!

वनपरिसरात ध्वनिप्रदूषण होत असेल तर वनविभाग वन्यजीव कायद्यानुसार निश्चितपणे कारवाई करू शकतो. पोलीस प्रशासनानेही या लोकांवर ध्वनी कायद्यान्वये कारवाई करावी. मात्र तसे होत नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे, अशी खंत चंद्रपूरच्या वन्यजीवप्रेमींनी बोलून दाखवली. ताडोबा बफरच्या उपसंचालक पीयुषा जगताप यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असता त्यांनी सर्व आरोप फेटाळले. असा प्रकार होत नाही, असे त्यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Night parties cause trouble for villagers and wildlife noise continues all night in resorts and hotels near tadoba rsj 74 mrj