अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा मुद्दा खासदार राहुल शेवाळे यांनी काल लोकसभेत उपस्थित केला होता. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. याचे पडसाद आज विधिमंडळातदेखील बघायला मिळाले. दरम्यान, खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप केले असून या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी विधानपरिषदेत केली. या मागणीची दखल घेत विधानपरिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी राहुल शेवाळे यांची एसआयटी चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
काय म्हणाल्या मनिषा कायंदे?
खासदार राहुल शेवाळे यांनी सुशांतसिंह प्रकरणावरून आदित्य ठाकरेंवर आरोप केल्यानंतर ठाकरे गटदेखील आक्रमक झाला आहे. शेवाळेंना प्रत्युत्तर देण्यासाठी ठाकरे गटाने राहुल शेवाळेंवरील बलात्काराच्या आरोपाचा मुद्दा आज विधानपरिषेदत उपस्थित केला. या मुद्यावरून आज विधानपरिषदेत गरारोळ झाल्याचेही बघायला मिळालं. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी राहुल शेवाळे यांची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी केली. “खासदार राहुल शेवाळे यांच्याबद्दल महिलेने गंभीर तक्रार केली आहे. तिच्यावर बलात्कार झाल्याचे आणि तिला मारपीठ झाल्याचे आरोप तिने केले आहेत. याबाबत तिने मुंबई पोलिसांकडे रितसर तक्रारदेखील दाखल केली आहे. तसेच त्या महिलनेने पंतप्रधान कार्यालय आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडेही तक्रार केली आहे. तिच्या जिवाला धोका असल्याचेही तिने म्हटले आहे. मात्र, मुंबईचे पोलीस आयुक्त तिच्या तक्रारीला दाद देत नाहीत. त्या महिलेवर प्रचंड दबाव आहे. तिला मुंबईला येऊन पोलीस आयुक्तांना भेटायचे आहे. मात्र, तिला इथे येऊ दिले जात नाही. त्यामुळे याप्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करावी”, असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा – दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा
राहुल शेवाळेंच्या SIT चौकशी करण्याचे निर्देश
दरम्यान, मनिषा कायंदेंच्या या मागणीनंतर विधानपरिषेदच्या सभापती निलम गोऱ्हे यांनीही राहुल शेवळेंच्या एसआटी चौकशीचे निर्देश दिले. एकीकडे दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहे. मात्र, “आता राहुल शेवाळे यांच्यावर महिलेने गंभीर आरोप केले असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मी राहुल शेवाळेच्या एसआयटी चौकशीचे आदेश देत आहे”, अशी प्रतिक्रिया निलम गोऱ्हे यांनी दिली.