वन्यप्राण्यांचे शहरात येण्याचे प्रमाण सारखे वाढतच आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास जयप्रकाश नगरातील उद्यानात आढळलेल्या नीलगायीने परिसरातील नाल्यात ठाण मांडले. मात्र, सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राच्या चमुने नाल्यातील घाण पाण्याची पर्वा न करता जखमी झालेल्या नीलगायीला जीवदान दिले.

सहकारनगर घाटापासून विमानतळाकडे जाणारा आणि ‘सोनेगाव आमराई’ या नावाने ओळखला जाणारा मार्ग जंगलसदृश्य आहे. या परिसरात मोर कायम वास्तव्यास असतात, तर कधी हरीणही आढळून येते. याच आमराईलगत असलेल्या जयप्रकाश नगरातील उद्यानात मंगळवारी दुपारी नीलगाय आढळून आली. कुतूहलापोटी परिसरातील नागरिक येथे गोळा झाले. त्यामुळे नीलगायीने तेथून पाय काढता घेत पुन्हा आमराईच्या दिशेने धूम ठाेकली, पण यादरम्यान कुत्रे नीलगायीच्या मागे लागले. त्यामुळे जीव वाचवण्याच्या प्रयत्नात ती वाहनांना धडकली. अखेर तिने नाल्यात ठाण मांडले.

हेही वाचा : गडचिरोलीमध्ये लोहखनिज वाहतूक जिवावर उठली ; प्रशासनाला लोकांच्या जिवापेक्षा कंपनीचे हित महत्त्वाचे?

याठिकाणी पुन्हा नागरिकांची गर्दी झाली. त्यातील काहींनी सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राला दूरध्वनीवरुन माहिती दिली. वनपाल एस.बी. खडोदे, अनिरुद्ध खडसे, वनरक्षक एच.एस. कापडे यांनी घटनास्थळ गाठले. यावेळी ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुदर्शन काकडे, पशूपर्यवेक्षक पंकज थोरात, सिद्धांत मोरे, प्रकाश गायकवाड, वाहनचालक स्वप्नील भुरे, चेतन बारस्कर, महेश मोरे वाहनासह घटनास्थळी पोहोचले. तब्बल दोन ते तीन तासानंतर नीलगायीला बाहेर काढण्यात यश आले.जखमी नीलगायीवर केंद्रात उपचार सुरू आहेत. या घटनेने पुन्हा एकदा वन्यप्राण्यांच्या शहरातील येण्यावर चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्यावर्षी सुमारे आठ दिवस बिबट्याने शहरात ठाण मांडले होते.

Story img Loader