भंडारा : आयपीएल क्रिकेटचे सामने रंगत असतानाच मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जात आहे. गोपनीय माहितीच्या आधारे डीबी पथकाने तुमसर शहरातील मालवीय वार्ड येथील दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकून ९ आरोपींना अटक केली आहे. यात पोलिसांनी ७४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध सनराइज हैदराबादमध्ये सामन्यात आयपीएल सट्टा खेळत असलेल्या तुमसर येथील मालवीय वार्ड येथील योगेश रमेश तिजारे (३२) रा. विनोबा नगर तुमसर, विवेक रविशंकर कौशल (२७) रा. विनोबा नगर तुमसर, योगेश श्रीधर चकोले (३२) रा. मालवीय वार्ड तुमसर, संजय हंसराज साठवणे (३०) रा. गोवर्धन नगर तुमसर, धीरज बालपांडे तुमसर, त्यांना अटक करण्यात आली, तर दुसऱ्या ठिकाणी धाड टाकून सुरेश दामोदर चकोले मालवीय वार्ड तुमसर, शुभम दामोदर चकोले , संजय साठवणे यांना अटक करण्यात आली.
दोन्ही ठिकाणाहून एकूण नऊ आरोपींना अटक करून गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून ६ अँड्रॉइड मोबाईल व जुगाराचे रेकॉर्ड जप्त करण्यात आले असून ७४००२ /- रुपयाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहे.